Rural police seize 8 country-made pistols and cartridges from 10 individuals
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील गावठी कट्ट्यांच्या आंतरजिल्हा तस्करीविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी विशेष मोहीम राबवत १० दिवसांत १० जणांना जेरबंद करत, त्यांच्याकडून ८ गावठी कट्टयासह १४ जिवंत काडतुसे जप्त केले. १३ ते २२ जूनदरम्यान ही विशेष मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत थेट कट्टे पुरविणाऱ्या डीलरपर्यंत पोहोचून आंतरजिल्हा रॅकेटचा पर्दाफाश केला.
पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखा व बिडकीन पोलिसांनी सलग कारवाया केल्या. पहिल्या कारवाईत बिडकीन परिसरात गणेश शिवाजी उघडे याच्याकडून एक गावठी कट्टा आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. चौकशीत पैठणसह अहिल्यानगर जिल्ह्यातील कट्टा पुरवठादारांचे धागेदोरे समोर आले. त्यानंतर अजय ऊर्फ रोमन शिंदे, राष्ट्रपाल तुपे, आकाश इंगळे, संतोष गायकवाड आणि निशांत पन्हाळे या डीलरला अटक करून आणखी तीन गावठी कट्टे व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
याच मोहिमेत गंगापूर येथे किशोर जाधव याच्याकडून एक गावठी कट्टा, काडतूस, बिडकीन परिसरात आकाश निकम व लखन राठोड यांच्याकडून दोन गावठी कट्टे, चार काडतुसे, तर अजिंठा परिसरात आबासाहेब मिसाळ याच्याकडून एक कट्टा, एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. सर्व आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हे
दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणारे आणि त्यांचा व्यापार करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी दिला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर अधीक्षक प्रशांत स्वामी, उपविभागीय अधीकारी सुनिल पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयसिंग राजपुत, सहायक निरीक्षक निलेश शेळके, लघु घोडे, महेश घुगे, एम. के. निकाळजे, कासिम शेख, सचिन राठोड, सुनील गोरे, बलबीर सिंग बहुरे, शिवाजी मगर, जीवन घोलप, वाल्मिक निकम, संजय चव्हाण, योगेश नाडे, वाजेद शेख, उमेश गुढे, हनुमान धनवे, विठ्ठल डोके, सनि खरात, योगेश तरमळे आदींनी केली.