Sambhajinagar News : ग्रामीण पोलिसांनी ७७ सराईतांच्या आवळल्या मुसक्या file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : ग्रामीण पोलिसांनी ७७ सराईतांच्या आवळल्या मुसक्या

२ कोटी ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त; पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांचे अवैध धंद्यांविरुद्ध 'झिरो टॉलरन्स'

पुढारी वृत्तसेवा

Rural police nab 77 habitual offenders

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात फोफावलेल्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी अवैध धंद्यांविरुद्ध 'झिरो टॉलरन्स' धोरण अवलंबले असून, एकाच रात्रीत राबवलेल्या 'ऑपरेशन ऑल आऊट' मध्ये तब्बल ७७ गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

या कारवाईत वाळूमाफिया, अवैध दारू विक्रेते आणि गोवंश तस्करांवर कारवाई करत २ कोटी ३२ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अपर पोलिस अधीक्षक, सर्व उपविभागीय अधिकारी आणि ठाणे प्रभारींच्या नेतृत्वात शनिवारी (दि.२०) संध्याकाळी ६ ते रविवारी पहाटे ६ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्याभरात हे 'ऑपरेशन ऑल आऊट' आणि कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले.

वाळूमाफियांचे कंबरडे मोडले

अवैध वाळू तस्करी, गौण खनिजाची चोरी व अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध ८ गुन्हे दाखल करून तब्बल १ कोटी ९८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल आणि ११ वाहने जप्त केली आहेत. याशिवाय, यापूर्वीच्या गुन्ह्यांतील ६० वाहने व १२ चालकांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठवला असून, जप्त केलेल्या ११ वाहनांच्या निलंबनाचे आदेशही दिले आहेत.

दारू व जुगार अड्यांवर धाड

हातभट्टी दारू तयार करणाऱ्या ९ आरोपींना अटक करत २० हजार रुपयांचे १,११० लिटर रसायन व साहित्य नष्ट केले. तर विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या ३१ जणांवर गुन्हे दाखल करत ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच जुगार खेळणाऱ्या २० आरोपींना ताब्यात घेऊन ५ लाख ३८ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शस्त्रास्त्रे व गोवंश तस्करी उघड

घातकी शस्त्रे बाळगून दहशत माजवणाऱ्या दोन जणांवर आर्म अॅक्टनुसार कारवाई करत २ गावठी कट्टे, ४ जिवंत काडतुसे आणि १ तलवार जप्त करण्यात आली आहे. गोवंश तस्करी व कत्तलीविरुद्ध २ गुन्हे दाखल करून ३ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यात १२ लाख ८४ हजारांचे १२० किलो गोमांस जप्त करून २४ गोवंश जनावरांची सुटका करत त्यांना गोशाळेत पाठवले आहे. यासोबतच प्रतिबंधित गुटख्याची चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करत १२ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हेगारांवर असाच वॉच राहणार ! या विशेष मोहिमेत एकूण ७३ गुन्हे दाखल करत ७७ आरोपींवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. भविष्यातही अशाच प्रकारे नाकाबंदी आणि कॉम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून असामाजिक 7 घटकांवर कठोर कारवाई केली जाईल.
- प्रकाश जाधव, पोलिस अधीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT