Operation All Out : 12 तासांत 72 गुन्हेगारांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

ग्रामीण पोलिसांचे ऑपरेशन ऑल आऊट; 1 कोटी 17 लाखांचा मुद्देमाल जप्त
Operation All Out
Operation All Out : 12 तासांत 72 गुन्हेगारांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्याfile photo
Published on
Updated on

Police nabbed 72 criminals within 12 hours

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील अवैध धंदे आणि गुंडगिरी मोडून काढण्यासाठी ग्रामीण पोलिस दलाचे नवनियुक्त अधीक्षक प्रकाश जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. संपूर्ण जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या ऑपरेशन ऑल आऊटमध्ये अवघ्या १२ तासांत तब्बल ७२ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या धडक कारवाईत १ कोटी १७ लाख ८४ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पोलिसांच्या या अॅक्शन मोडमुळे जिल्ह्यातील अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Operation All Out
Sambhajinagar News : अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत : पोलिस अधीक्षक

अधिक माहितीनुसार, शनिवारी (दि.६) सायंकाळी ६ ते रविवारी पहाटे ६ वाजेपर्यंत १२ तासांसाठी हे ऑपरेशन ऑल आऊट राबवण्यात आले. पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात आणि अपर अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या देखरेखीखाली सर्व उपविभागीय अधिकारी आणि पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी एकाच वेळी जिल्ह्यात नाकाबंदी आणि कोंबिंग ऑपरेशन केले.

यात अवैध वाळू वाहतूक, गावठी हातभट्टी, बेकायदेशीर दारू विक्री आणि जुगार अड्यांवर छापे टाकून एकूण ५३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ग्रामीण जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

वाळू माफियांना दणका :

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ८ वाहनांवर कारवाई करून १ कोटी ११ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात ११ आरोपींवर गुन्हे दाखल झाले असून, त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याचे प्रस्ताव थेट आरटीओकडे पाठवण्यात आले आहेत.

Operation All Out
Jalna Crime News : धारदार शस्त्रासह युवक जेरबंद, मुद्देमाल जप्त

हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त :

जिल्ह्यातील २० ठिकाणी छापे टाकून ५ हजार ६१८ लिटर रसायन आणि ४१९ लिटर तयार गावठी दारू तसेच साहित्य जागीच नष्ट करण्यात आले. या कारवाईत २० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विदेशी दारू व गुटखा जप्त :

विनापरवाना देशी-विदेशी दारू विकणाऱ्या १८ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ९२५ बाटल्या व वाहने असा दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच, खुलताबाद पोलिसांनी ७० हजार ६०० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे.

जुगार अड्ड्यांवर छापे :

जुगार खेळणाऱ्या २१ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून रोख रक्कम व साहित्य असा १७ हजारांचा ऐवज जप्त करत ६ गुन्हे दाखल केले. तर, मद्यपान करून वाहने चालवणाऱ्या (ड्रंक अँड ड्राइव्ह) ३ तळीरामांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अवैध धंदे चालवणाऱ्यांची गय नाही जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालविणाऱ्यांची गय केली जाणार नाही. यापुढेही अशाच प्रकारे अचानक - नाकाबंदी, कोंबिंग ऑपरेशन आणि ऑपरेशन ऑल आऊट सातत्याने राबविले जाईल. गुंडगिरी आणि अवैध व्यवसायांना पाठीशी घातले जाणार नाही
- प्रकाश जाधव, पोलिस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर, (ग्रामीण)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news