LPG Gas Pudhari
छत्रपती संभाजीनगर

LPG Gas : ग्रामीण भागातील स्वयंपाकघर गॅसवर

गॅस सिलिंडरचा सुरळीत पुरवठा करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Rural Kitchens Run on Gas

पिशोर, पुढारी वृत्तसेवा : कन्नड तालुक्यातील नाचनवेल, पिशोर तसेच परिसरातील अनेक गावांमध्ये सध्या घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत असून, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस सिलिंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने विशेषतः महिलांना स्वयंपाकासाठी मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे.

ग्रामीण भागातील बहुसंख्य कुटुंबे स्वयंपाकासाठी एलपीजी गॅसवर अवलंबून आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून गॅस एजन्सीकडे सिलिंडरचा पुरवठा अपुरा होत असल्याने नागरिकांना सिलिंडरसाठी अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. काही ठिकाणी गॅस सिलिंडर बुकिंग करूनही वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. परिणामी अनेक कुटुंबांना पुन्हा पारंपरिक चुलीचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.

या परिस्थितीचा सर्वाधिक फटका शेतकरी व मजुरी करणाऱ्या कुटुंबांना बसत आहे. महिलांना लाकूड गोळा करून चुलीवर स्वयंपाक करावा लागत असल्याने त्यांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाढत आहेत. तसेच चुलीमुळे निर्माण होणाऱ्या धुराचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, गॅस वितरकांकडून पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ग्रामीण भागात गॅस सिलिंडरचा पुरेसा आणि नियमित पुरवठा तातडीने सुरू करावा, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT