

A staggering 92 students from nine talukas appeared for the examination for the ISRO tour.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्त्रो) भेट देण्यासाठी जिल्हा परिषद शाळांमधील निवडक विद्यार्थ्यांची सहल नेण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व नऊ तालुक्यांमधून निवडलेल्या ९२ विद्यार्थ्यांची गुरुवारी (दि.१२) जिल्हास्तरावर चाचणी परीक्षा घेण्यात आली. यातून सुमारे तीस विद्यार्थ्यांची सहलीसाठी निवड करण्यात येणार आहे.
शहरातील बळीराम पाटील हायस्कूल येथे गुरुवारी जिल्हास्तरीय अंतिम टप्प्याची परीक्षा घेण्यात आली. याआधी केंद्रस्तर व तालुकास्तर यामध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीलय अंतिम टप्प्यासाठी निवड करण्यात आली.
ही परीक्षा ७५ गुणांची वस्तुनिष्ठ प्रश्न, २० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा आणि ५ गुणांची तोंडी परीक्षा अशी एकूण शंभर गुणांची होती. ग्रामीण भागातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांमधे वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा व भविष्यातील शास्त्रीय दृष्टिकोनाची बीजे त्यांच्यामध्ये रुजली जावी याकरिता जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरचा शिक्षण विभाग दरवर्षी ही चाचणी आयोजित करण्यात येते.
या माध्यमातून ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ही दुर्मिळ संधी उपलब्ध करून दिल्या जाते. जिल्हास्तरावर गुण-वत्ता यादीत आलेले विद्यार्थी हे विमानाद्वारे इसरो सेंटर येथे भेट देतील. सदर इस्त्रो सहल निवड प्रक्रियेचे नियोजन आयोजन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित आणि जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
आज झालेल्या जिल्हास्तरीय इस्त्रो निवड चाचणीचे संनियंत्रण शिक्षण विस्तार अधिकारी संगीता सावळे आणि मनीषा वाशिंबे यांनी केले. बळीराम पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शहरातील शाळांमधील विज्ञान शिक्षक यांनी संपूर्ण परीक्षा प्रक्रियेची जबाबदारी पार पाडली.