मराठवाड्याला अतिरिक्त ८० टीएमसी पाणी देण्यासाठी ७० हजार कोटींचा प्रकल्प  FIle Photo
छत्रपती संभाजीनगर

मराठवाड्याला अतिरिक्त ८० टीएमसी पाणी देण्यासाठी ७० हजार कोटींचा प्रकल्प

जलसंपदा मंत्री विरवे : सात वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन

पुढारी वृत्तसेवा

Rs 70,000 crore project to provide additional 80 TMC water to Marathwada

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पश्चिमवाहिनी नद्यांचे ८० टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी हायब्रीड अॅन्यूटी तत्वावर ७० हजार कोटी रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्याचा डीपीआर जानेवारी महिन्यात राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पुढील सात वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे दिली.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची ८७ वी बैठक शुक्रवारी (दि.१९) पार पडली. बैठकीनंतर विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार अब्दुल सत्तार, आमदार विलास भुमरे, गोदावरी महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले की, गोदावरी खोरे हे तुटीचे खोरे आहे. त्यामुळे पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी हायब्रीड अॅन्यूटी तत्वावर ७० हजार कोटी रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येईल. सध्या त्याचा डीपीआर बनविण्याचे काम सुरू आहे. हा डीपीआर जानेवारी २०२६ मध्ये राज्य सरकारकडे सादर करण्यात येईल. त्यानंतर पुढील सात वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल.

जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्याची दुरुस्ती नुकतीच करण्यात आली आहे. आता डाव्या कालव्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी नाबार्डकडे ८०० कोटी रुपयांचा निधी मागण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली. जायकवाडी धरणावर एनटीपीसीकडून १००० मेगावॅट क्षमतेचा फ्लोटिंग सोलार प्रकल्प राबविण्यात येणार आहे. जायकवाडी धरणाचे क्षेत्र खूप मोठे असल्यामुळे याठिकाणी आणखी काही क्षेत्रांमध्ये अशा प्रकल्पांना मंजुरी देण्यात येईल, असेही विखे पाटील यांनी सांगितले.

बैठकीत घेण्यात आलेले निर्णय

१) पश्चिमवाहिनी उल्हास व वैतरणा खोऱ्यातील पाणी गोदावरी खोऱ्यात आल्यानंतर त्याचे नियोजन करण्यासाठी सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

२) प्रायोगिक तत्वावर वांबोरी चारी टप्पा १ व २ करिता नेट मीटरिंग कार्यपद्धतीमध्ये वीज निर्मिती करण्यासाठी मुळा धरणावर फ्लोटिंग सोलार कार्यान्वित करणे व निम्न तेरणा प्रकल्पावर जमिनीवरील सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय झाला.

३) हिंगोली जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष दूर करण्याच्या अनुषंगाने सुकळी व दिग्रस या दोन साठवण तलावांच्या कामाच्या एकूण २२५ कोटी रकमेचे अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेसाठी शासनास सादर करण्याचा निर्णय झाला.

४) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाकोद व शिवना टाकळी या दोन मध्यम प्रकल्पांची वितरण व्यवस्था बंद नलिकेद्वारे करण्याच्या ३०० कोटी किमतीच्या कामाचा निर्णय झाला.

५) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाकोद प्रकल्पासाठी असलेल्या पिंपळगाव वळण येथील अस्तित्वातील को. प. बंधाऱ्याचे निम्न पातळी बंधाऱ्यामध्ये रूपांतर करण्याच्या २५ कोटी किमतीच्या कामाचा निर्णय झाला. यासह विविध विषयावर १२ निर्णय घेण्या आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT