

15 bikes seized from vehicle thieves, stolen bikes were sold in rural areas
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहर तसेच विविध तालुक्यांतून दुचाकी चोरणाऱ्या सराईत दुचाकी चोरासह, चोरी केलेल्या दुचाकी विक्री करणाऱ्या दोघांना सिडको पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून ८ लाख ३० हजार रुपये किमतीच्या तब्बल १५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. योगेश कैलास गाडेकर (२६, रा. जाधववाडी), मुबारक युनुस शेख (२५, रा. मोहदरी, नायगाव, सावंगी) असे सराईत दुचाकी चोरांची नावे आहेत.
शहरासह विविध तालुक्यांत दुचाकी चोरून धुमाकूळ घालणारा वाहन चोरटा त्याच्या साथीदारासह जाधववाडी मोंढा परिसरात दुचाकी विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती सिडको पोलिसांनी मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून योगेश कैलास गाडेकर, मुबारक युनूस शेख या दोघांना अटक केली. योगेश विरोधात वडोद बाजार, पैठण दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तर मुबारक शेख चोरीच्या दुचाकी कमी दरात ग्रामीण भागांत विक्री करत होता, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
तपासादरम्यान मिळाली माहिती या प्रकरणात अमोल तांगडे या तरुणाच्या तक्रारीवरून १६ सप्टेंबर रोजी सिडको पोलिस ठाण्यात दुचाकी (एमएच-२१-बीएस-६५३४) चोरीचा गुन्हा दाखल होता. या तपासादरम्यान योगेश व मुबारकची माहिती हाती लागली. ते दुचाकी विक्री करण्यासाठी जाधववाडी मोंढा येथे आल्यानंतर ते लागले. पोलिसांच्या हाती त्यांच्याकडून शेतात व घरात लपवून ठेवलेल्या चोरीच्या ८ लाख ३० हजार रुपये किमतीच्या तब्बल १५ दुचाकी जप्त करण्यात आल्या. याच जोडगोळीचे सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल ४ गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक आयुक्त मनोज पगारे, निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार सुभाष शेवाळे, हवालदार मंगेश पवार, प्रदीप दंडवते, विशाल सोनवणे, प्रदीप फरकाडे, सहदेव साबळे, अमोल अंभोरे यांनी केली.