लासूर स्टेशन : जेवायला थांबलेल्या लासूर स्टेशन येथील कापूस व्यापाऱ्याच्या कारगाडीच्या डिक्कीतून १४ लाख रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजे दरम्यान नागपूर मुंबई महामार्गावर आसेगाव चौकात घडली.
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार मंजरपूर येथील रहिवास हबीब शहाबुद्दीन पठाण लासूर स्टेशन येथे कापसाचा व्यापार करतात ते शुक्रवारी दुपारी छत्रपती संभाजीनगर येथून त्यांच्या कारमधून १४ लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन लासूर स्टेशनकडे येत होते दरम्यान ते आसेगाव चौकात जेवणासाठी एका हॉटेलवर थांबले. त्यांची कार बंद केल्यानंतर सुरू होत नव्हती. त्यामुळे ते गाडी सुरूच ठेवून गाडीच्या बाजूलाच जेवायला बसले.
जेवण आटोपल्यावर त्यांना गाडीत बसल्यावर त्यांच्या लक्षात आले की, गाडीच्या डिक्कीतून पैसे चोरी झाले. काही वेळ चोरी गेलेल्या रकमेचा तपास केल्यानंतर त्यांनी दौलताबाद पोलिस स्टेशनकडे धाव घेऊन घटना कळवली. रात्री उशिरा दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.