

गंगापूर: माळीवाडगाव (ता. गंगापूर) परिसरातील शेतकऱ्यांचे पिकांवर धुळीचे साम्राज्य पसरले असून लाखोंचे नुकसान होत आहे. लासूर देवगाव रोडच्या कामासाठी तब्बल २९ कोटी रुपयांचे बजेट असूनदेखील रस्त्यावर पाणी मारणे बंद करण्यात आल्यामुळे शेतकरी आपला संताप व्यक्त करत आहेत.
कोटींच्या रस्त्यावर पाणी मारायला ठेकेदाराकडे पैसे नाहीत ? की पाणी मारायचंच नाही? अशा बेफिकीर ठेकेदराला कोण संरक्षण देतं? फ्फ असा थेट सवाल महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते शेतकरी गोरखनाथ गोरे यांनी उपस्थित केला आहे. रस्त्यावरून दिवसभर उडणाऱ्या धुळीचा थर शेतांवर बसल्याने पिकांची प्रकाश संश्लेषण प्रक्रिया थांबून वाढ खुंटली, तर अतिवृष्टीमुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
याच भागात सहा महिन्यांपूर्वी बाभुळगाव परिसरातील एका शेतकऱ्याचा धुळीमुळे बळी गेला होता, अशी आठवणही शेतकरी बांधवांनी करून दिली. या प्रकरणी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत असून निर्णयाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. धूळ शेतकऱ्यांच्या पिकावर बसत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. असे शेतकरी ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी खंत व्यक्त केली.
प्रशासनाची उदासीनता
रस्त्यावर पाणी न मारल्याने पिकांची अवस्था खराब होत असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आता या नुकसानीची भरपाई कोण देणार? असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे ठेकेदाराच्या मनमानीला आळा बसत नाही. पिकांचे रक्षण करण्यासाठी स्वतःच्या शेतातील पाणी रस्त्यावर मारण्याची वेळ येणे ही शेतकऱ्यांवर आली आहे.