Chhatrapati Sambhajinagar  
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar|हात कायमचा सुटला! गावाकडे परतत असताना अपघात; वडिलांचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी

Chhatrapati Sambhajinagar- वडिलांचा हात कायमचा सुटला! अपघातात वडिलांचा मृत्यू, १२ वर्षीय मुलगा गंभीर जखमी.

पुढारी वृत्तसेवा

पिशोर : नाचनवेल चौफुलीवरून सारोळा गावाकडे बाप-लेक परतत असताना आमदाबाद फाट्याजवळ अपघाती निधन झाले. या अपघातात कारभारी हारसिंग बिघोत (वय ३६) यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा यश कारभारी बिघोत (वय १२) गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कन्नड सिल्लोड राज्य रस्ता क्रमांक १७८ वरून आपली मोटरसायकल पॅशन प्रो क्रमांक एम. एच.२० ई.डब्लू ४७६७ वरून जात असताना ही घटना घडली. या दुर्दैवी घटनेमुळे सारोळा गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कारभारी हरसिंग बिघोत हे बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर) रात्री नाचनवेल चौफुलीवरून आपल्या मुलासह सारोळा गावाकडे परतत होते. रात्री सुमारे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आमदाबाद फाट्याजवळ त्यांच्या अपघात झाल्याने कारभारी बिघोत यांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

या अपघातात त्यांचा १२ वर्षीय मुलगा यश हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. आपल्या वडिलांचा मृत्यू मुलाच्या डोळ्यादेखत झाल्याने या घटनेने उपस्थितांचे मन हेलावून टाकले.

कारभारी बिघोत हे कुटुंबातील कर्ते पुरुष होते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत ते आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत होते. अचानक झालेल्या या अपघाताने कुटुंबाचा आधार हरपला असून बिघोत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) सकाळी शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास कारभारी बिघोत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी व भाऊ असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT