Sambhajinagar Crime News : रिक्षा चालकाने प्रवाशाचा केला खून; रिक्षा मालकालाही अटक File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime News : रिक्षा चालकाने प्रवाशाचा केला खून; रिक्षा मालकालाही अटक

रेकॉर्डवरील गुन्हेगारांना रिक्षा चालविण्यास देणे भोवले, छावणी पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Rickshaw driver kills passenger; rickshaw owner also arrested

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: गुन्हेगारी कृत्यात सहभागी असणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना रिक्षा चालविण्यास देणाऱ्या मालकावरही यापुढे कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी शनिवारी दिला होता.

त्यानंतर छावणी भागात रिक्षाचालकाने प्रवासी तरुणाचा चाकूने वार करून खून केल्याच्या गुन्ह्यात रिक्षा मालकाला छावणी पोलिसांनी रविवारी (दि.१५) अटक केली. सय्यद मझरोद्दीन सय्यद अलिमोद्दीन (३०, रा. राहुलनगर, गल्ली क्र ३, रेल्वेस्टेशन) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

फिर्यादी मयत जयराम बबन पिंपळे (२७, रा. वडाळा, श्रीरामपूर, जि. नगर) हा ३ जूनला जेजे हॉस्पिटल येथे आला होता. ४ जूनला त्याची शिक्षण पात्रता परीक्षा असल्याने तो मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास बाबा पंपाजवळ गेला. तेथून त्याने वाळूज पंढरपूर जाण्यासाठी रिक्षा पकडली.

रिक्षा चालक मुजम्मील कुरेशी रफिक कुरेशी (२१, रा. सादातनगर) याने जयरामला तू तोंडाला मास्क का लावला असे म्हणत वाद घातला. होलिक्रॉस शाळेजवळ त्याला अंधारात घेऊन गेला. शिवीगाळ करून त्याच्या छातीत व पोटात चाकूने वार करून गंभीर जखमी केले. जयराम जखमी अवस्थेत पळत जेजे हॉस्पिटल येथे गेला. त्यानंतर उपचार सुरु असताना त्याच्या तक्रारीवरून छावणी ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.

त्यानंतर जयराम याचा उपचारदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी ७ जूनला आरोपी मुजम्मील कुरेशीला अटक केली होती. दरम्यान, कुरेशीकडे लायसन्स नसताना, तसेच त्याच्याविरुद्ध यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल असून, तो सोबत चाकू बाळगतो याची माहिती असताना त्याला रिक्षा चालविण्यास देणारा रिक्षामालक सय्यद मझरोद्दीन याला देखील छावणी पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात रविवारी अटक केली.

आरोपीला रिक्षा चालवण्यास देऊन गुन्हा करण्यास अप्रत्यक्षरीत्या प्रोत्साहित केल्याचा मझरोद्दीनवर ठपका ठेवण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, डीसीपी शिलवंत नांदेडकर, प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनात एपीआय विवेक जाधव, उपनिरीक्षक संजय रोडके, जमादार सिद्धार्थ थोरात, रवींद्र देशमुख, कैलास सोरमारे यांनी केली.

आरटीओचे मनुष्यबळाचे रडगाणे

शहरात वाहतुकीचे नियमन करणारे वाहतूक पोलिसच रिक्षाचालकांवर कारवाई करतात. मूळ जबाबदारी असणारे प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी मात्र शहरात फिरकतही नाहीत. पोलिस आयुक्तांनी आरटीओच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. तेव्हा आरटीओकडून नेहमीप्रमाणे आमच्याकडे मनुष्यबळ कमी असल्याचे रडगाणे सुरु केले. दुसरीकडे महामार्गावर अडजड वाहनावर अर्थपूर्ण कारवाईसाठी आरटीओ विभाग अग्रेसर असतो हे विशेष.

प्रवाशांसोबत गैरवर्तन झाल्यास रिक्षा मालकही जबाबदार

रिक्षावर चालक ठेवताना त्याची पूर्व चारित्र्यतापडताळणी करून घ्यावी. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे का? परवाना आहे का याची खात्री करूनच त्याला कामावर घ्यावे. कोणत्याही गुन्ह्यात रिक्षाचालक आढळून आल्यास रिक्षा मालकाला देखील आरोपी करण्यात येईल. परवाना एकाचा आणि रिक्षा चालवितो तिसराच असे देखील प्रकार समोर आलेत. विशेषतः दारू पिऊन महिलांची छेड किंवा गैरवर्तन करताना आढळून आल्यास कडक कारवाई करणार.
- प्रवीण पवार, पोलिस आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT