छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर विभागातील बोगस दस्त नोंदणीसह जमिनीच्या फसवणुकीची प्रकरणे गंभीर आहेत. भूमाफियांचे हे जाळे तातडीने उद्ध्वस्त करा आणि ही संघटित गुन्हेगारी मोडून काढा, असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (दि.१०) दिले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी बुधवारी मंत्रालयात आढावा बैठक घेतली. बैठकीला इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, छत्रपती संभाजीनगरचे पोलिस आयुक्त, पुणे येथील नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, तसेच छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक व महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. फसणुकीच्या प्रकरणांमध्ये आजपर्यंत कोणती कारवाई झाली, याचा अहवाल तात्काळ सादर करा, असे निर्देशही बावन्नकुळे यांनी दिले.
छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील विविध दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये आतापर्यंत झालेल्या गैरप्रकारांची माहिती यावेळी देण्यात आली. प्रामुख्याने बनावट खरेदीखत आणि खोटी वारस प्रमाणपत्रे तयार करणे, सरकारी दस्तांमध्ये बेकायदेशीर फेरफार करणे, एकाच जमिनीची दुबार विक्री करून शासनाची व नागरिकांची फसवणूक करणे आदींचा यात समावेश आहे.
या प्रकरणी दोन्ही जिल्ह्यांत मिळून १६ गुन्हे दाखल असून, सध्या त्यांचा कसून तपास सुरू आहे. या संघटित साखळीचा शोध घेऊन दोषींना शिक्षा करण्याचे निर्देश बावन्नकुळे यांनी दिले. सामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आणि शासनाचा महसूल बुडवणाऱ्या भूमाफियांविरोधात कठोर भूमिका घ्या. पोलिसांनी केवळ गुन्हे नोंदवून थांबू नये, तर या संपूर्ण रॅकेटच्या मुळाशी जावे. महसूल, नोंदणी आणि पोलिस विभागाने संयुक्त मोहीम राबवून ही गुन्हेगारी नष्ट करावी, असेही बावन्नकुळे म्हणाले.