Kolhapur Crime : नशेखोर, शस्त्रधारी गुंडांमुळे कोल्हापूर शहर, उपनगरे दहशतीखाली!

पडद्याआडच्या गुन्हेगारीमुळे धोक वाढला : कायद्याचा नाही राहिला धाक
Kolhapur Crime
नशेखोर, शस्त्रधारी गुंडांमुळे कोल्हापूर शहर, उपनगरे दहशतीखाली!Pudhari
Published on
Updated on

दिलीप भिसे

कोल्हापूर :नशेखोर, शस्त्रधारी गुन्हेगारी टोळ्यांच्या जीवघेणी दहशतीमुळे शहरासह उपनगरे असुरक्षित बनल्याची सामान्यांची भावना आहे. खुन्नस, वैमनस्य, सराईत गुंडांच्या वर्चस्वातून सुडचक्र सुरूच आहे. खुनी हल्ला, अपहरण, खंडणी वसुलीसह सावकाराकडून होणाऱ्या पिळवणुकीमुळे सामान्य, निष्पाप भरडला जात आहे. टोळीयुद्धातील वर्चस्वातून एकमेकांवर होणारे हल्ले, तोडफोड, दगडफेक या घटनांची सामान्यांना झळ सोसावी लागत आहे. समाजकंटकांवर कायद्याचा धाक आहे की नाही, अशी काहीशी शंकास्पद स्थिती आहे.

कायद्याला उघड आव्हान देत समाजात अस्थिरता निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांसह आर्थिक पिळवणूक करणाऱ्यांवर पोलिस कायद्याचा बडगा उगारणार आहेत की नाही, असा खडा सवाल सामान्यांतून विचारला जात आहे. शहरातील टिंबर मार्केट, गंजीमाळ, राजाराम चौकसह संभाजीनगर परिसरात ज्यांचा गुन्हेगारी टोळ्यांशी दुरान्वयेही संबंध नाही, रोजीरोटीसाठी मिळेल तो कामधंदा करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणाऱ्या निष्पाप कुटुंबांना गुन्हेगारी टोळ्यांच्या कारनाम्यांची झळ सोसावी लागत आहे.

जवाहरनगर, सुभाषनगरसह राजेंद्रनगर परिसरातून दुचाकीवरून भरधाव आलेल्या 30 ते 35 जणांच्या नशेखोर, शस्त्रधारी टोळक्याने टिंबर मार्केट, गंजीमाळ, राजाराम चौक परिसरात मध्यरात्री अक्षरश: धुमाकूळ घातला. चौकासह गल्ली, बोळात पार्किंग केलेल्या मोटार, टेंपो, रिक्षा, दुचाकीसह मोकळ्या स्टॉल गाड्यावर हल्ला करून प्रचंड तोडफोड केली. काही घरांवर दगडफेक झाली. टोळक्याने आरडाओरड करीत दहशत माजविली.

टोळक्यांच्या हातातील जीवघेणी शस्त्रे पाहून घराबाहेर पडण्याचेही नागरिकांना धाडस झाले नाही. व्यवसायासाठी कर्जे काढून घेतलेल्या वाहनांची तोडफोड त्यांना उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. मध्यरात्री दोन वाजेपर्यंत समाजकंटकांचा धिंगाणा सुरू होता. गुंडांच्या थरारनाट्याचे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रण होत असतानाही संशयित भानावर नव्हते. दारात पार्किंग केलेल्या वाहनांची धडाधड तोडफोड सुरू होती. परिसरातील नागरिकांनी मध्यरात्री पोलिस यंत्रणांशी संपर्क साधला. पोलिसांची कुमक दाखल होताच समाजकंटक पसार झाले.

आठवड्यापूर्वी राजारामपुरी पोलिसांनी हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण, खंडणीप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली. पाच खुनाच्या गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेल्या सराईताने 7 लाखाच्या कर्जापोटी 3 महिन्यात 20 लाखांची वसुली केली.

चार-पाच दिवसांपूर्वी राजेंद्रनगर परिसरात किरकोळ कारणातून दोन शाळकरी मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला झाला. कोवळी मुलं गंभीर जखमी झाली. फिर्याद दाखल करून घेण्यासाठी पालक, नातेवाईकांना राजारामपुरी पोलिस ठाण्यांची उंबरे झिजवावे लागले. विक्रमनगर येथील महापालिकेची पडीक इमारत म्हणजे सराईत गुन्हेगार, गांजा, दारू तस्करांचा खुलेआम अड्डा बनला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news