Registration of 1,200 units in violation of SOPs
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाने सामान्य कुटुंबाचा विचार करून तुकडाबंदी आदेश रद्द केला. त्यासोबतच मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली. यानुसार १५ ऑक्टोबर २०२४ पूर्वीचेच तुकडे नियमित करण्यास मंजुरी दिली. तसेच रेखांकन मंजूर नसलेल्या एकाही भूखंडाची रजिस्ट्री करू नये, असे आदेशात बजावले. परंतु असे असतानाही जिल्ह्यातील १३ दुय्यम निबंधक कार्यालयांत केवळ ८ महिन्यांत एसओपीचे उल्लंघन करून तब्बल १२०० तुकड्यांची रजिस्ट्री करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये अधिकृत भूखंडांपेक्षा अनधिकृत भूखंडांचीच सर्वाधिक प्रमाणात नोंदणी होते. यात प्रत्येक दुय्यम निबंधक कार्यालयांकडून झोन दाखल्याला बगल देण्यात येत आहे. प्रत्यक्षात या दाखल्याशिवाय तुकड्यांची रजिस्ट्री करू नये, असे स्पष्ट आदेश आहेत. मात्र त्या आदेशालाच आता अधिकारीच केराची टोपली दाखवत आहेत. हा प्रकार शहरालगतच्या तुकड्यांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात सर्वाधिकप्रमाणात सुरू असल्याची धक्कादायक माहिती मागील आठ महिन्यांत झालेल्या रजिस्ट्रींच्या आकडेवारीहून पुढे आली आहे.
शहरातील एका दुय्यम निबंधक कार्यालयात दिवसाला किमान ५० दस्तांची नोंदणी होते, तर तालुकास्तरावरील दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये दिवसाला ३५ ते ४० व्यवहार होतात. त्यानुसार जिल्ह्यात दररोज किमान ५०० दस्तांची नोंदणी होते. त्यात एसओपीचे उल्लंघन करून सुमारे १५ टक्के दस्त हे तुकड्यांच्या नोंदणीचे आहेत. दररोज शहर आणि तालुक्यांच्या दुय्यम निबंधक कार्यालयात सुमारे ३५ हून अधिक तुकड्यांची नोंदणी होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार मागील ८ महिन्यांत किमान १२०० दस्त एसओपीचे उल्लंघन करून नोंदविण्यात आले असून, यात शहरालगतच्या सुमारे २५ हून अधिक वसाहतींतील तुकड्यांचा समावेश आहे.
मागील ८ महिन्यांतील दस्त नोंदणीची तपासणी
तुकड्यांच्या रजिस्ट्रीला लगाम लावणे शक्य होत नसल्याने आता शासनाने मागील ८ महिन्यांत झालेल्या दस्त नोंदणीच्या तपासणीचे आदेश दिले आहेत. परंतु जिल्ह्यात ही तपासणी दुय्यम निबंधकांकडून होणार आहे. जिल्ह्यातील सर्वच कार्यालयांमध्ये हा प्रकार झाला आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यालय स्वतःचा बचाव करणार आहे. त्यामुळे तपासणी व त्यानंतर होणारी उलट चौकशी सर्व काही सोपस्कार ठरणार असल्याची चर्चा आहे.