Rape victim threatened to withdraw crime
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृतसेवा लग्नाचे आमिष दाखवून विभक्त महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपी वकिलाने गुन्हा मागे घे अन्यथा तुझी सुपारी देतो, असे धमकावत अश्लील व्हिडिओ पाठवून व्हायरल करण्याचीही धमकीही दिली. हा प्रकार शनिवारी (दि.१३) रात्री पावणेबाराच्या सुमारास मुकुंदवाडी भागात घडला.
अॅड. महेंद्र भगवान नैनाव (रा. उत्तरानगरी, साईनक्षत्र अपार्टमेंट) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी २७ वर्षीय पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, ती गेल्या तीन महिन्यांपासून शिक्षणासाठी आरोपी अॅड. महेंद्र नैनावसोबत राहत होती. त्याने तिच्यावर लग्नाचे आमिष दाखून लैंगिक अत्याचार केल्यामुळे त्याच्याविरुद्ध ३ ऑगस्ट रोजी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
तेव्हापासून ती वेगळे राहत आहे. दरम्यान, शनिवारी रात्री घरी असताना तिला आरोपी नैनावचा व्हॉट्सअॅपवर मेसेज आला. अश्लील बोलून, तू केस मागे घेणार बोलली होती, परंतु तू केस मागे न घेता परत पोलिस ठाण्यात तक्रार केली आहेस. मी तुझी सुपारी देतो, माझ्याकडे तुझे दुसऱ्या मुलांसोबतचे फोटो आहेत, माझ्यासोबतही तुझे काही व्हिडिओ आहेत, ते मी व्हायरल करून तुझी बदनामी करेल, अशी धमकी दिली.
त्यांतर तिच्या इंस्टाग्रामवर दोघांचे अश्लील एडिट केलेले व्हिडिओ पाठवला. पीडितेने तो तिच्या संरक्षणासाठी असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याला दाखविला. त्याचवेळी आरोपी नैनावने तो डिलिट करून टाकला. त्यावरून रविवारी (दि. १४) मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात आरोपी महेंद्र नैनाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार घडल्यानंतर मध्यरात्री पीडिता मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गेली. मात्र कर्तव्यावरील महिला पोलिस अंमलदाराने तिला अरेरावी करून धक्काबुक्की केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. बराच वेळ ठाण्यात गोंधळ सुरू होता. तिने वरिष्ठांना फोन केले. मात्र काहीही कारवाई न केल्याने तिने रविवारी पालकमंत्री संजय शिरसाट यांची भेट घेऊन प्रकार सांगितला. त्यांनी तात्काळ पोलिस प्रशासनाला पीडितेला न्याय मिळवून देण्याचे आदेश दिले.