किंग इज बॅक' म्हणत जामिनावर सुटलेल्या आरोपीची रॅली file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : किंग इज बॅक' म्हणत जामिनावर सुटलेल्या आरोपीची रॅली

▶▶ सिडको पोलिस ठाण्याजवळच दहशत माजवणाऱ्या ११ जणांवर गुन्हा- इन्स्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल; चार गाड्यांमधून काढली होती मिरवणूक-

पुढारी वृत्तसेवा

Rally held for an accused released on bail, proclaiming "The King is Back."

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सिडको पोलिस ठाण्यात दाखल अपहरणाच्या गुन्ह्यातून नुकत्याच जामिनावर सुटलेल्या गुन्हेगाराचे 'किंग इज बँक' असे उदात्तीकरण करत भररस्त्यात रॅली काढल्याचा प्रकार सिडको पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रामलीला मैदान व शहरातील अन्य भागात घडला. गुंडगिरीची दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने काढलेल्या या रॅलीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर टाकणे या टोळक्याला चांगलेच भोवले असून, पोलिसांनी स्वतःहून दखल घेत ११ जणांवर आणि इतर २-३ अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला आहे.

सचिन आण्णा कुसाळकर, किशोर किसन क्षत्रिय, चेतन जालिंदर गुंजाळ, सचिन काळे, अनिल केदार, अमोल धनवट, भरत गायके, गंगा निकम, गणेश काळे, दिनेश धायडे आणि जगदीश खरातकर अशी आरोपींची नावे आहेत. यातील धनवट एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे.

याप्रकरणी अंमलदार अमोल अंभोरे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सिडको पोलिस ठाण्यात जुलैमध्ये एका फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने थार गाडी जप्त केल्यानंतर ती सोडून दे म्हणत त्याच्या भावाचे अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी सचिन कुसाळकर याला न्यायालयाने अटी-शर्तीवर जामीन मंजूर केला होता. तो जामिनावर सुटून आल्यानंतर त्याच्या साथीदारांनी १९ सप्टेंबर रोजी एन-७ सिडको येथील रामलीला मैदानाच्या समोरील रस्त्यावर त्याची जंगी मिरवणूक काढली. आरोपींनी काळ्या रंगाची झुंदाई व्हर्ना (एमएच-२६-बीसी-५६८६), स्विफ्ट (नंबर नसलेली), काळी स्विफ्ट (एमएच-५७-२४२२) आणि एक मोपेड (एमएच-२०-एचई-८६०९) वापर करत बेदरकारपणे वाहने चालवली.

सचिन कुसाळकर हा व्हर्ना कारच्या सनरूफमधून बाहेर उभा होता, तर त्याचे साथीदार फटाके फोडून रस्त्यावर दहशत निर्माण करत होते. या गुंडगिरीचा व्हिडिओ चेतन गुंजाळ याने 'किंग इज बॅक' अशा कॅप्शनसह त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून प्रसारित केला होता. रविवारी (दि. २०) दुपारी १२ वाजेच्या सुमारास अंमलदार अंभोरे यांना सोशल मीडियावरील व्हिडिओंची तपासणी करत असताना त्यांना हा प्रकार निदर्शनास आला.

पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या. सार्वजनिक शांततेचा भंग करून गुंडगिरीचे उदात्तीकरण करणे आणि लोकांमध्ये दहशत निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक अनिल नाणेकर करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT