Raising awareness by simultaneously taking a pledge to end child marriage in 100 hotspot villages
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बालविवाह निर्मूलनाच्या दिशेने जिल्हा प्रशासनाने चांगले पाऊल टाकत १०० हॉटस्पॉट गावांमध्ये एकाचवेळी बालविवाह मुक्तीची शपथ देऊन जनजागृतीला नवी चालना दिली. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली २७ नोव्हेंबर २०२४ रोजी सुरू करण्यात आलेल्या बालविवाह मुक्त भारत प्रकल्पाला आज एक वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्याने हा उपक्रम राबविण्यात आला. २०३० पर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्हा पूर्णपणे बालविवाहमुक्त करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
ज्या गावांमध्ये बालविवाहाचे प्रमाण अधिक आहे, अशा १०० गावांची निवड हॉटस्पॉट म्हणून करण्यात आली. या गावांमध्ये शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षिका, सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, शाळा सल्ला समिती, महिला बचत गट, तसेच अंगणवाडी सेविका-मदतनीस यांनी एकत्र येत सामूहिकरित्या शपथ घेतली.
गावातील प्रत्येक स्तरावरून मिळालेल्या प्रतिसादामुळे ही मोहीम प्रभावी ठरत असल्याचे शाळांचे मुख्याध्यापक आणि ग्रामपंचायत प्रतिनिधींनी सांगितले. या उपक्रमासाठी जिल्हा परिषद आयसीडीएस, शिक्षण, पंचायत, आरोग्य व महिला-बालविकास विभागांना युनिसेफ व एसबीसी-३ यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभागाचे ज्ञानेश्वर रोडगे, बाल संरक्षण अधिकारी महादेव डोंगरे, युनिसेफ/एसबीसी-३ चे जिल्हा प्रकल्प समन्वयक बाळकृष्ण साळुंके, पंचायत विभागाचे सहाय्यक सुरेश कापसे व विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे गावांमध्ये नक्कीच बदल घडणार असल्याचे चित्र दिसत आहे.- यशवंत जगोरे, उपसरपंच
सर्व गावाला सामावून घेऊन ही प्रतिज्ञा घेण्यात आली आहे. या प्रतिज्ञेबाबतचा निरोप मुलांच्या पालकांपर्यंत सहजपणे पोहोचविण्यात आला आहे.- लक्ष्मी देवकर, अंगणवाडी