Rain wreaks havoc in Marathwada; Heavy rainfall in 44 mandals
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यात दमदार पुनरागमन केलेल्या पावसाने अनेक जिल्ह्यांना अक्षरशः धुतले आहे. विभागातील तब्बल ४४ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १५, नांदेड जिल्ह्यातील १०, हिंगोली जिल्ह्यातील ९, जालना जिल्ह्यातील ९ आणि लातूर जिल्ह्यातील एका महसूल मंडळाचा समावेश आहे. चोवीस तासांत हिंगोली आणि जालना जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली.
मराठवाड्यात मागील सलग तीन दिवस जोरदार पाऊस बरसला. त्याआधी जवळपास वीस दिवस पावसाने मराठवाड्याकडे पाठ फिरिवली होती. त्यामुळे हजारो हेक्टरवरील पिके धोक्यात आली होती. तसेच मराठवाड्यातील लहान मोठ्या सिंचन प्रकल्पांमध्येही पुरेसा जलसाठा होऊ शकला नव्हता.
मात्र, २४ जुलैपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली आणि संपूर्ण मराठवाडा ओलाचिंब झाला. अनेक छोटे प्रकल्प पाण्याने भरून गेले. काही जिल्ह्यांत नदी-नाल्यांसह ओढ्यांना पूर आला. आता शनिवारी सकाळी ८ वाजेपासून रविवारी ८ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत मराठवाड्यात सरासरी ३२.९ मिमी पावसाची नोंद झाली.
यामध्ये हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक ५२ मिमी पाऊस बरसला. त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यातदेखील तब्बल ४७ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वात कमी १५ मिमी पाऊस परभणी जिल्ह्यात झाला. विभागात एकूण ४४ महसूल मंडळांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले. श्रावणात झालेल्या या पावसाने शेतकरीवर्ग चांगलाच सुखावला आहे.