

Rain all day in the city
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात शनिवारी पावसाने अक्षरशः धुवाधार बंटिंग केली. गेल्या दोन दिवसांपासून रिपरिप स्वरूपात सुरू असलेल्या पावसाने शनिवारी मात्र मुसळधार हजेरी लावली. यामुळे शहारात चार ठिकाणी झाडे को-सळली. विशेषतः दुपारी साडेबारा ते दीड वाजेच्या दरम्यान पावसाचा जोर इतका वाढला की अनेक भाग जलमय झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत चोवीस तासांत शहर परिसरात ३१.० मिमी पावसाची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली असून जिल्ह्यातील तीन महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीचीही नोंद झाली आहे.
दुपारी १२ वाजेनंतर वातावरण अधिकच ढगाळ झाले आणि पावसाने रौद्ररूप धारण केले. काही वेळासाठी रस्ते नदी-नाल्याचे स्वरूप घेत होते. अधूनमधून रिपरिप तर कधी जोरदार सरींनी संपूर्ण दिवसभर शहर पाण्यात भिजवले. या पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले होते.
मुख्य रस्त्यांवर वाहने संथ गतीने चालू होती. दुचाकीस्वार, पादचारी आणि चारचाकी चालकांना अडचणींचा सामना करावा लागला. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून शहरसह जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली होती. परंतु गेल्या तीन दिवसांपासून सर्वदूर संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेती पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे.
दरम्यान पावसाचा जोर संध्याकाळी ६ ते ७वाजेच्या सुमारास काहीसा ओसरला. मात्र हवामान विभागाने रविवारीही जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
जल्ह्यातील सिल्लोड, पैठण, कन्नड, गंगापूर, खुलताबाद, सोयगाव, फुलंब्री आणि वैजापूर या सर्व तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे जमिनीची ओल वाढल्याने शेतीच्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. हवालदिल झालेल्या बळीराजाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आशेचा किरण दिसून आला आहे.
शनिवारच्या पावसात सकाळी ७ वा. सेव्हन हिल परिसरातील जानकी हॉटेललगत एक गुलमोहराचे झाड उन्मळून पडले. दुपारी २ वाजेच्या सुमारास जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळ पोलिस नियंत्रण कक्ष परिसरातही निंबाचे झाड कोसळले.
दुपारी ३.१५ वा. नक्षत्रवाडी परिसरात महिंदुस्थान आवासफ मध्ये एक मोठे झाड पडले. सायंकाळी ४.४५ च्या सुमारास सिडकोतील बजरंग चौकात एक झाड रस्त्यावर आडवे झाल्याने काही काळ वाहतुकीस अडथळा आला होतो. जुना मोंढा भागातील अभिनय टॉकिजच्या बाजूस रोडवर पाणी साचल्याने पादचाऱ्यांसह वाहनधारकांची तारांबळ उडाली होती. या सर्व घटनांच्या ठिकाणी अग्रिशामक दलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेऊन पडलेली झाडे बाजूस हटविली, असल्याची माहिती अग्निशामक दलाचे वरिष्ठ अग्रिशामक गवळी यांनी दिली.