Sambhajinagar Rain : शहरासह परिसराला पावसाने झोडपले, सखल भागात साचले पाणी  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Rain : शहरासह परिसराला पावसाने झोडपले, सखल भागात साचले पाणी

दोन तासांत ०.६६ मिमी पाऊस

पुढारी वृत्तसेवा

Rain lashed the city and surrounding areas, water accumulated in low-lying areas

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: शहर व परिसराला पावसाने शनिवारी (दि.९) रात्री झोडपून काढले. मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास सुरू झालेल्या पाऊस सुमारे दोन तास मुसळधार बरसला. या धुवांधार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. तर सखल भागात गुडघाभर पाणी साचल्याने मोठी तळी निर्माण झाली होती.

त्यामुळे नागरिकांची मोठी धांदल उडाली. रविवारीही (दि.१०) सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला. शहरात दोन तासांत ०.६६ मिमी पाऊस पडला असून, कमाल व किमान तापमानात घट झाल्याची चिकलठाणा वेध शाळेत नोंद झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरासह परिसराला जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. मात्र हवामानातील बदलामुळे पावसाने खंड दिला. शनिवारी दिवसभर कडक उन्हामुळे तापमानात चांगलीच वाढ झाली होती. दरम्यान रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास शहरासह परिसरात धुवांधार पाऊस बरसला. सलग सुमारे दोन तास सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते.

शहरातील रेल्वेस्टेशन परिसरातील उड्डाणपुलाखालील सखल भागांत तर समतानगर परिसरातील पाण्याच्या टाकी परिसरासह उस्मानपुरा, औरंगपुरा भागातील सखल परिसरात पाणी भरले. यासह शहर व परिसरातील विविध सखल भागांत पाणी साचले. त्यामुळे वाहनधाराकांची त्रेधातिरपीट उडाली. काही भागातील घरांमध्ये अल्पप्रमाणात पाणी शिरले. तर रविवारी सायंकाळी अनेक भागांत ढगांच्या गडगडाटात पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान पाऊस पडून गेल्यानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला असून, जिल्ह्यात पुढील चार दिवस काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे कमाल व किमान तापमान घटणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

या भागात साचले पाणी...

सातारा परिसरातील मुख्य गावठाण, उड्नणपूल, बीड बायपासवरील उड्डाणपुलाखालील, एमआयटी परिसर कैलासनगर, मोंढा, मारुती मंदिर परिसरातील सखल भाग, औषधी भवन, गोमटेश मार्केट, औरंगपुरा भाजीबाजार परिसर, पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम जिथे जिथे सुरू आहे तिथे, पैठण रोड, गोलवाडी, इटखेडा, कांचनवाडी या रस्त्यांवरील पादचारी परिसरात मोठ्याप्रमाणात पाणी साचले होते.

दोन तासांत ०.६६ मिमी पाऊस

शहर व परिसरात शनिवारी रात्री सुमारे दोन तासांत ०.६६ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली असून, कमाल ३१.८ अंश सेल्सिअस तर किमान २०.८ अंश सेल्सिअस तापमानाची चिकलठाणा वेधशाळेत नोंद झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT