छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात जून महिन्यात दडी घेतल्यानंतर जुलैच्या प्रारंभी पावसाने दमदार कमबॅक घेतला, परंतु एक-दोन वेळा जोरदार बसरल्यानंतर पुन्हा दडी मारली आहे. जुलैच्या २० दिवसांपैकी केवळ १० दिवसच पावसाने हजेरी लावली असून, पैठण, सिल्लोड आणि फुलंब्री या तालुक्यांमध्ये अनुक्रमे ६, ८ आणि ८ दिवसच पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखीच वाढली आहे.
यंदा मान्सूनवर अलनिनोचा परिणाम असेल, असा अंदाज हवामान विभागाने अगोदरच व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दमदार पाऊस झाल्यानंतरच पेरण्या कराव्यात, असे आवाहनही कृषी विभागाकडून करण्यात आले होते. परंतु जिल्ह्यात जून महिन्याच्या अखेरीस पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. त्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली.
सलग चार दिवस पाऊस बरसला. काही भागात दमदार तर काही ठिकाणी तुरकळ स्वरूपात सरी कोसळल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे चेहरे फुलले होते. दरम्यान, १० जुलैपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाने दडी मारली आहे. मागील सहा दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यात हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येणारे अंदाजही चूकत आहेत.
त्यामुळे शेतकरी पावसाकडे नजरा गाडून आहे. मागील तीन दिवसात जिल्ह्यात केवळ तुरळक स्वरूपाचाच पाऊस पडत आहे. सध्या पिकांना दमदार पावसाची गजर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.