Railways takes action against 21,000 passengers who travelled for free in a single month
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने १ जानेवारी ते ३१ जानेव-ारीदरम्यान विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवली.
या एकाच महिन्यात विविध रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या २१ हजार जणांवर कारवाई करत तब्बल १ कोटी २५ लाख १७ हजार २९० रुपयांचा महसूल दंडासह वसूल केला, अशी माहिती नांदेड विभागाने दिली. ही रक्कम जानेवारी २०२५ च्या तुलनेत १५.०१ टक्क्यांनी अधिक आहे.
या तिकीट तपासणी मोहिमेत जानेवारी महिन्यात २१९ तिकीट तपासणी कर्मचारी कार्यरत होते. त्यात ३४ स्क्वॉड कर्मचारी, १६७ ऑन-बोर्ड (अमेनिटी) आणि १८ स्टेशनरी कर्मचारी यांचा समावेश होता. मोहिमेअंतर्गत १२ फोर्ट्रेस तपासण्या, २ मॅसिव्ह आणि १ स्पॉट तपासणी करण्यात आली. तसेच १५ अचानक व रात्रकालीन तपासण्या घेण्यात आल्या. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरपीएफ आणि रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेण्यात आले.
४ जानेवारीला एकाच दिवसात ५ लाखांची वसुली विशेष म्हणजे ४ जानेवारीला एकाच दिवसात सर्वाधिक कारवाई करत ९०९ प्रकरणे नोंदविली आणि ५ लाख ४८ हजार ७३८ रुपये इतकी दंड वसुली केली. ही महिन्यातील सर्वोच्च एकदिवसीय कामगिरी ठरली. ही मोहीम आदिलाबाद-नांदेड, परभणी-परळी, छत्रपती संभाजीनगर-मनमाड तसेच विभागातील इतर महत्त्वाच्या मार्गावर राबविण्यात आल्याची माहिती वरिष्ठ मंडल वाणिज्य व्यवस्थापक डॉ. विजय कृष्णा यांनी दिली.
ही तिकीट तपासणी मोहीम केवळ अनियमित प्रवासावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी नसून, प्रामाणिकपणे तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी राबविण्यात येत आहे. दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी प्रवाशांनी तिकीट काढूनच प्रवास करण्याचे आवाहन नांदेड विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.