

Fifty thousand students took the scholarship exam
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवारी (दि.२२) जिल्ह्यात इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील तब्बल ५० हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. तर सुमारे २७०० विद्यार्थी नोंदणी करूनही परी क्षेला गैरहजर राहिले. जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांच्या ठिकाणी दोन सत्रांत ही परीक्षा पार पडली.
इयत्ता पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा दरवर्षी आयोजित केली जाते. यात पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाकडून दरमहा शिष्यवृत्ती दिली जाते. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.
यंदाही इयत्ता पाचवीतील ३१ हजार ६०० विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते. या विद्यार्थ्यांचे दोन पेपर घेण्यात आले. दोन्ही पेपरला मिळून ३० हजार २७विद्यार्थी हजर राहिले. तर उर्वरित सोळाशे विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली.
तसेच, आठवीतील एकूण २१ हजार ४५६ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते. त्यापैकी २० हजार ३८२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. तर सुमारे अकराशे विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले.
७ हजारांपर्यंत शिष्यवृत्ती
ग्रामीण आणि शहरी भागातील गुणवंत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही रक्कम दिली जाते. यामध्ये पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील तीन वर्षांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. पाचवीच्या पात्र विद्यार्थ्यांना पाच हजार ते साडेसात हजार रुपये प्रतिवर्ष याप्रमाणे ही शिष्यवृत्ती मिळते. तर आठवीच्या पात्र विद्यार्थ्यांना साडेसात हजार ते दहा हजार प्रतिवर्ष याप्रमाणे शिष्यवृत्तीची रक्कम दिली जाते.