ढोरेगावातील पान सेंटरवर धाड file photo
छत्रपती संभाजीनगर

Gutkha seized : ढोरेगावातील पान सेंटरवर धाड

सव्वापाच लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, पाच जणांविरुद्ध गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

Raid on paan center in Dhoregaon

गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : गंगापूर तालुक्यात प्रतिबंधित गुटख्याच्या अवैध व्यवसायाला मोठा हादरा देत स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने रविवारी (दि.१९) पहाटे ढोरेगाव येथील मे. रॉयल पान सेंटरवर धाड टाकली. या कारवाईत ५ लाख २२ हजार ६७० किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी दुकान मालकासह पाच जणांविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्तार नूर सय्यद व अशरफ अहमद मिर्झा यांना अटक करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे, पोलिस उपनिरीक्षक लहू घोडे, सचिन सोनार, शिवानंद बनगे, विजय धुमाळ, अनिल काळे, सनी खरात, चालक शिवाजी मगर व महेश बिरुटे यांच्या पथकाने पहाटे दोनच्या सुमारास रॉयल पान सेंटरवर छापा टाकला. झडतीदरम्यान महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला मोठ्या प्रमाणातील गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा प्रमोद सुरसे यांनी घटनास्थळी पंचांसमक्ष साठ्याची तपासणी करून नमुने जप्त केले, तर उर्वरित माल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. तसेच दुकान पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आले.

कारवाईदरम्यान विविध बँडचा ५,२२,६७० किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. चौकशीदरम्यान दुकान चालकाकडे या मालाची कोणतीही खरेदी बिले आढळून आली नाहीत. तपासात हा माल अशरफ अहमद मिर्झा (रा. भरतनगर, वाळूज), सिराज सय्यद, सोहेल सय्यद (दोघे रा. सिल्क मिल कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) तसेच प्रभाकर किसन साळुंखे (रा. लिंबेजळगाव, ता. गंगापूर) यांच्याकडून आणल्याची माहिती समोर आली.

याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांच्या फिर्यादीवरून मुख्तार नूर सय्यद (दुकान मालक), अशरफ अहमद मिर्झा, सिराज सय्यद, सोहेल सय्यद आणि प्रभाकर किसन साळुंखे यांच्याविरुद्धगुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी मुख्तार सय्यद व अशरफ मिर्झा यांना पोलिसांनी अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

संपूर्ण साखळीचा तपास :

फिर्यादीत या प्रकरणातील उत्पादक, पुरवठादार, आर्थिक लाभ घेणारे तसेच संघटित पद्धतीने प्रतिबंधित तंबाखू व्यवसाय करणाऱ्या संपूर्ण साखळीचा तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. तपासात संघटित गुन्हेगारीचे स्वरूप स्पष्ट झाल्यास संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गतही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सलीम चाऊस करीत असून, पोलिस हवालदार व्ही. एल. पाखरे यांनी गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT