नाशिक : जिल्ह्यातील तीन हजार 265 प्राथमिक आणि दोन हजार 318 माध्यमिक शाळांमधील 12 लाख 63 हजार 161 विद्यार्थ्यांपैकी दोन लाख 32 हजार 713 विद्यार्थ्यांच्या ‘अपार आयडी’चे काम पूर्ण झाले असून, उर्वरित विद्यार्थ्यांच्या आयडीचे काम अपूर्ण आहे.
दिवाळी सुट्या आणि विधानसभा निवडणुकीचे कामकाज यामुळे अपार आयडीचे काम रेंगाळले आहे, मात्र निवडणुकीचे कामकाज संपताच हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी दिल्या आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ‘वन नेशन वन स्टुडंट आयडी’च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑटोमेटेड परमनंट अकॅडेमिक रजिस्ट्री (अपार) आयडी काढण्याचा निर्णय घेतला आहे. या आयडीमुळे विद्यार्थ्यांना विशेष क्रमांक मिळेल. या त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती डिजिटल स्वरूपात साठवली जाणार असून, ती हवी तेव्हा ऑनलाइन पाहता येईल. त्यामुळे महिनाभरात नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध करण्याच्या सूचना राज्य प्रकल्प संचालकांकडून जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राप्त झाल्या आहेत.
महाराष्ट्रासाठी समग्र शिक्षणाचे राज्य प्रकल्प संचालक नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. दरम्यान, पालकांच्या परवानगीने विद्यार्थ्यांचा अर्ज भरून घेतले जातील. या आयडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती डिजिटल स्वरूपात साठवण्यात येणार असल्याने त्यांच्या शैक्षणिक प्रवासाचे मॉनिटरिंग करता येणार आहे.
प्रगती अहवाल, शाळाबाह्य मुलांचा शोध, गळतीचे प्रमाण घटवण्यास मदत आदी बाबी नियंत्रित करण्यात येणार आहेत. अपार आयडी तयार झाल्यानंतर तो डीजीलॉकरला जोडण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात साधलेले लक्ष्य, परीक्षेचे निकाल आणि स्पर्धा परीक्षांमधील यश हे सारे त्यांना ऑनलाइन पाहता येईल. ‘अपार’ मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड एका शाळेतून दुसर्या शाळेत किंवा जिल्हा आणि राज्यामध्ये ऑनलाइन पाठवणे सुलभ होईल. ‘अपार’ आयडी विद्या समीक्षा केंद्रांना जोडण्यात येऊन त्या माहितीचे ग्राफिकल अॅनालिसिस करण्यात येईल.