Crime News : छावणीत राडा : गोवंश भरलेला ट्रक पकडणाऱ्या पोलिसांवर टोळक्याचा जीवघेणा हल्ला file photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : छावणीत राडा : गोवंश भरलेला ट्रक पकडणाऱ्या पोलिसांवर टोळक्याचा जीवघेणा हल्ला

डोक्यात दगड लागल्याने अंमलदार गंभीर जखमी; ८ जणांवर गुन्हा दाखल, पाच अटकेत

पुढारी वृत्तसेवा

Rada in the camp: A gang fatally attacked the police who caught a truck full of cattle

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: सिल्लोडच्या कारखान्याच्या कामगारांचे बैल अहिल्यानगर येथे घेऊन जाणारा ट्रक कत्तलीसाठी गोवंश घेऊन जात असल्याच्या संशयावरून छावणी परिसरातील केशर मॉलसमोर ६० ते ७० तरुणांच्या जमावाने पकडला. त्यानंतर जोरदार राडा झाला. घटनास्थळी आलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. जमावातील एकाने पोलिस अंमलदाराच्या डोक्यात दगड घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच इतर पोलिसांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा प्रकार रविवारी (दि. ४ ऑक्टोबर) मध्यरात्री पावणेबारा वाजता घडला.

नितीन चौधरी, ऋषभ यादव, ओमकार भंडारी, धीरज साकल, व्यंकटेश यादव, सागर केसरे, जगदीश यादव आणि लखन यादव ऊर्फ बाबा (सर्व रा. छावणी) अशी पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांची नावे आहेत. यातील पाच आरोपीना अटक केली असून न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती छावणी पोलिस ठाण्याचे प्रभारी विवेक जाधव यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छावणी ठाण्याचे अंमलदार दीपक सोनवणे हे रविवारी रात्री होमगार्ड मुळे यांच्यासोबत नाईट पेट्रोलिंगवर होते. रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास त्यांना नियंत्रण कक्षाकडून केशर मॉलसमोर, सार्वजनिक रोडवर काही लोकांचे भांडण सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ते तातडीने घटनास्थळी पोहोचले.

तिथे अंदाजे ६० ते ७० तरुणाचा जमाव जमला होता आणि त्यांच्यामध्ये एमएच-१६-डीएल-५२८५ हा आयशर ट्रक उभा होता. पोलिसांनी ट्रकमध्ये पाहिले असता, त्यात गोवंश जातीची १६ जनावरे अत्यंत दाटीवाटीने आणि क्रूरपणे कोंबलेली दिसली. जमलेल्या जमावातील कोणीतरी ट्रकची चावी काढून घेतली होती आणि ते ट्रक ड्रायव्हरसोबत हुज्जत घालत होते. जमावामध्ये प्रामुख्याने नितीन चौधरी, ऋषभ यादव, ओमकार भंडारी, धीरज साकल, व्यंकटेश यादव, सागर केसरे, जगदीश यादव आणि लखन यादव ऊर्फ बाबा हे तरुण होते.

ट्रक सोडून कसे देता? म्हणत पोलिसांवरच हल्ला अंमलदार दीपक सोनवणे यांनी जमावाला समजावून सांगत, तुम्ही ट्रकची चावी मला द्या, मी ट्रक पोलिस ठाण्यात घेऊन जातो आणि कायदेशीर कारवाई करतो असे सांगितले. मात्र, जमावातील एकही तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तुम्ही त्यांना सोडून कसे देता? असे म्हणत त्यांनी पोलिसांसोबतच हुज्जत घातली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून सोनवणे यांनी ड्युटी ऑफिसर सुरेश माळी आणि 112 वरील इतर अंमलदारांना मदतीसाठी बोलावून घेतले.

वरिष्ठ अधिकारी पोहोचेपर्यंत कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, म्हणून सोनवणे यांनी होमगार्ड मुळे यांना ट्रकमध्ये बसवून तो ट्रक ठाण्यात नेण्याचा प्रयत्न केला. याचाच राग येऊन आरोपींनी सोनवणे यांना बेदम मारहाण केली.

गोवंशप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध स्वतंत्र गुन्हा

दुसरीकडे, ड्युटी ऑफिसर सुरेश माळी यांच्या फिर्यादीवरून गोवंशाची अवैधरीत्या वाहतूक करणारा आयशर ट्रकचा (एमएच-१६-डीएल-५२८५) चालक रोशन संजय थिटे (२६, रा. गारगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ट्रकची तपासणी केली असता, त्यात १६ बैल अत्यंत क्रूरपणे कोंबून नेले जात असल्याचे निष्पन्न झाले. हा ट्रक सिल्लोड येथील एका कारखान्यातून कामगारांचे बैल घेऊन अहिल्यानगरकडे जात होता. परवानगी १० जनावरांची असताना त्याने उल्लंघन केल्याचे समोर आले. प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमसह अन्य कलमांनुसार स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आयशर ट्रक आणि १६ जनावरे जप्त केले.

अंमलदाराचा पाठलाग करून लाथाबुक्क्यांनी मारहाण

याच मारहाणीदरम्यान आरोपी ओमकार ऊर्फ चिन्ना भंडारी याने तिथेच पडलेला एक मोठा दगड उचलून थेट अंमलदार सोनवणे यांच्या डोक्यात घातला. या हल्ल्यामुळे सोनवणे यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागले आणि त्यांचा संपूर्ण सरकारी गणवेश रक्ताने माखला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ते जवळच असलेल्या व्हॉलीबॉल मैदानाच्या दिशेने पळत सुटले. मात्र, आरोपी ऋषभ, बाबा, ओमकार, धीरज आणि व्यंकटेश यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना शिवीगाळ करत पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कसाबसा जीव वाचवून सोनवणे छावणी पोलिस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी वरिष्ठांना या हल्ल्याची माहिती दिली. सोमवारी (दि. ५) सकाळी छावणी पोलिसांत आरोपीविरुद्ध बीएनएसच्या कलम १३२, १२१ (२), १८९(१), १८९(२), १९१(१), १९१(३), १९०, ११५(२), ३५१ (२), ३५१ (३) आणि ३५२ अन्वये सरकारी कामात अडथळा, पोलिसांवर जीवघेणा हल्ला आणि दंगल माजवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT