पूरसंरक्षक भिंतींची कामे बनली लुटीचे कुरण pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Flood Protection Wall Projects : पूरसंरक्षक भिंतींची कामे बनली लुटीचे कुरण

जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव परत पाठविल्याने अधिकारी, ठेकेदार अन् लोकप्रतिनिधींमध्ये अस्वस्थता

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर :जलसंपदा विभाग, लघु पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग आदी विभागांकडून पूरसंरक्षक भिंतींची कामे ही लुटीचे कुरण ठरत आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालनासह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत गरज नसताना कोट्यवधी रुपयांची कामे सुचविण्यात येत आहेत.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी पूरसंरक्षक भिंतीचे 140 प्रस्ताव परत पाठविल्याने अधिकारी, ठेकेदार आणि कामे सूचविणाऱ्या लोकप्रतिनिधींमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

जलसंपदा विभाग आणि लघु पाटबंधारे विभागाकडून पूर नियंत्रणाच्या नावाखाली दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कामे केली जातात. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत अशी अनेक कामे नियमबाह्यरीत्या झाल्याचे नुकतेच समोर आले आहे. दै. पुढारीने पुराव्यांसह हा प्रकार समोर आणला. त्यामुळे आता ही कामे वादात अडकली आहेत. काही कामांच्या निविदा प्रक्रिया नदीची पूररेषा निश्चित होण्याआधीच राबविल्याचेही स्पष्ट झाले आहे.

यंदाही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून पूरसंरक्षक भिंत उभारणीच्या कामांचे सुमारे दीडशे प्रस्ताव सादर झाले होते. जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी या कामांच्या अनुषंगाने नुकतीच बैठक घेतली.

मात्र गौडा यांनी हे सर्व प्रस्ताव फेरपडताळणीसाठी संबंधित विभागांकडे परत पाठविण्याचा निर्णय घेतला. यातील जवळपास 70 प्रस्ताव हे जलसंपदा विभागाकडून, 70 प्रस्ताव लघु पाटबंधारे विभागाकडून आणि काही प्रस्ताव हे सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून सादर करण्यात आले होते.

काही प्रस्ताव हे 30 लाख रुपयांच्या आत तर काही प्रस्ताव हे एक कोटीच्या आतील खर्चाचे होते. या सर्व प्रस्तावांची एकत्रित किंमत ही सुमारे शंभर कोटींच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे. आमदार, खासदार, मंत्री तसेच वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे तालुका आणि जिल्हास्तरीय पदाधिकारी यांच्या शिफारशीवरून संबंधित विभागांनी तयार करून ते जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेसाठी सादर केले होते.

मराठवाड्यात हजार कोटींवर प्रस्ताव

छत्रपती संभाजीनगरप्रमाणेच मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्येही यंदा पूरसंरक्षक भिंतींच्या कामांचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत. या सर्व प्रस्तावांची एकत्रित किंमत ही सुमारे आठ ते हजार कोटींच्या घरात असल्याचे समजते. यातील बहुसंख्य प्रस्ताव हे जलसंपदा आणि लघु पाटबंधारे विभागामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर झाले आहेत.

पात्र एक किमी, काम 20 किमीचे

छत्रपती संभाजीनगर पूरसंरक्षक भिंतीचे जे प्रस्ताव सादर झाले होते, त्यांची रंजक माहिती आता समोर येत आहे. काही गावांभोवती नदीचे पात्र अगदी अर्धा ते एक किलोमीटरचेच असताना तिथे पूरसंरक्षक भिंतीचे तब्बल 20 किमीचे काम प्रस्तावित करण्यात आलेले आहे. तर काही ठिकाणी जिथे याआधीच कधीच पुराचा इतिहास नाही, तिथेही अशी कामे सूचविण्यात आली आहेत.

सन 2022-23 मध्ये केंद्र सरकारने 15 व्या वित्त आयोगांतर्गत आपत्ती व्यवस्थापनाच्या कामांसाठी राज्य सरकारला निधी दिला होता. त्यातून गेली तीन वर्षे राज्यात विविध ठिकाणी कामे करण्यात आली. आता पंधराव्या वित्त आयोगाची मुदत 31 मार्च रोजीच संपली. तरी अजूनही मराठवाड्यात असे प्रस्ताव दाखल होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT