

Sambhajinagar News: Seven consecutive works worth crores to one person
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जलसंपदाच्या संभाजीनगरातील लघु पाटबंधारे विभाग १ प्रमाणेच जालना लघु पटबंधारे विभागाच्या निविदाही संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहे.
कारण नुकत्याच काढलेल्या सहा कोटींच्या सलग सातही कामांमध्ये केवळ अतुल निकम आणि सार्थक कन्स्ट्रक्शन या दोन ठेकेदारांनाच पात्र ठरविण्यात आले. तिसऱ्या ठेकेदार कंपनीने तर कमालच केली. सात वेळा निविदा भरल्या; परंतु तांत्रिक मूल्यांकनावेळी आम्हाला या कामात रस नाही, असे कारण देत माघार घेतली. तर आणखी एका कंपनीला या सर्वच निविदांत एकसारख्याच त्रुटी दाखवत अपात्र केले. यावरून या सर्व कामांमध्ये रिंग असल्याच संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या कागदपत्रांनुसार, जलसंपदाच्या जालना लघु पाटबंधारे विभागाने २३ मार्च २०२६ रोजी जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील कोठी खडका, अंतरवाली टेंभी, कंडारी (अंबड), बोडखा (बु), खडका व अंबड तालुक्यातील दादेगाव या सात ठिकाणी पूर संरक्षक भिंत बांधकामाच्या सात वेगवेगळ्या निविदा जारी केल्या.
प्रत्येक निविदा सरासरी ८५ लाख ५० हजार रुपये दराची आहे. म्हणजेच सरासरी ६ कोटींच्या या निविदा होत्या. त्यातील कोठी गावच्या निविदेत एकूण ८ कंत्राटदारांनी सहभाग नोंदविला. खडकावाडी कामाच्या निविदेत ११, अंतरवाली टेंभीच्या निविदेत ११, कंडारी (अंबड) च्या कामात १०, दादेगावच्या निविदेत ५, बोडखा (बु) त ५ व खडका गावच्या निविदेत ७ स्पर्धक कंत्राटदार सहभागी झाले.
निविदा भरायची अन् माघार घ्यायची
या सातही निविदांमध्ये नलगे कन्स्ट्रक्शन या कंपनीची भूमिका संशय निर्माण करणारी आहे. या कंपनीने सर्व निविदा तर भरल्या; परंतु निविदा उघडण्याच्यावेळी आपल्याला या कामात रस नाही, असे पत्र देत माघार घेतली. जर कामच करायचे नाही, तर निविदा भरण्याचा अट्टहास का?
सारख्याच कामासाठी एकीकडे पात्र, दुसरीकडे अपात्र कसे?
या सातही निविदांचे आणखी एक वेगळेपण म्हणजे संभाजीनगरच्या अमर इन्फा या कंपनीला सहा निविदांत कामासाठी लागणाऱ्या मशनरीची कागदपत्र सादर न केल्याचे कारण दाखवून अपात्र ठरविले. तर एका ठिकाणी त्यांनी दाखविलेला काँक्रीट मिक्सिगचा प्लांट दिलेल्या मर्यादेबाहेर असल्याचे कारण दाखवून अपात्र केले. विशेष म्हणजे याच अमर इन्फ्राने गतवर्षी संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यात पूर सरंक्षक भिंती बांधकामांची जवळपास १२ कोटींची चार कामे केली आहेत. याचा अर्थ अमर इन्फ्राकडे या कामासाठी आवश्यक मशनरी आणि कागदपत्र आहेत. जालन्यातील हे सातही कामे त्याच पद्धतीची होती. मग निविदांमध्ये अमर इन्फ्राने त्रुटी का ठेवली? ही बाबही संशयास्पद आहे.
हा योगायोग नव्हे रिंग?
जालना जिल्ह्यातील या सातही निविदांमध्ये घडलेला हा योगायोग नसून अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमताने केलेली ही रिंग असल्याचा आरोप आता होत आहे. मर्जीतील ठेकेदारांनाच ही कामे मिळावीत, यासाठी या निविदांमध्ये सहभागी झालेल्या मर्जीबाहेरील ठेकेदारांना काहीही कारणे देऊन अपात्र ठरविण्यात आले असून या पात्र ठरलेल्या दोघांपैकी एकाला हे काम देण्यात येणार असल्याचे सांगितल्या जाते. जालन्यातील हे जलसंपदात चालणाऱ्या निविदांच्या रिंगचे केवळ एक प्रातिनिधिक उदाहरण आहे,