PM Awas Yojana : डिपॉझिटच्या अटीमुळे पीएम आवासच्या घरकुल स्वप्नांवर प्रश्नचिन्ह file photo
छत्रपती संभाजीनगर

PM Awas Yojana : डिपॉझिटच्या अटीमुळे पीएम आवासच्या घरकुल स्वप्नांवर प्रश्नचिन्ह

लाभार्थीपुढे एक लाख भरण्याचा पेच : प्रशासनाकडे सवलतीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Question mark over PM Awas's dream of owning a house due to deposit condition

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

महापालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत घरकुल मिळाल्याचा आनंद साजरा करणाऱ्या लाभार्थीसमोर आता एक नवीन अडचण उभी ठाकली आहे. लकी ड्रॉद्वारे निवड झाल्यानंतर लाभार्थीना एक लाख रुपयांचे डिपॉझिट भरण्याची अट घालण्यात आल्याने अनेक जण संभ्रमात पडले आहेत. एवढी मोठी रक्कम अल्पावधीत कशी उभी करावी, असा प्रश्न लाभार्थीकडून उपस्थित केला जात आहे.

महापालिकेकडून तीसगाव, पडेगाव, सुंदरवाडी आणि हसूल या भागांत एकूण पाच गृहनिर्माण प्रकल्प उभारले जात आहेत. यामध्ये सुमारे ११ हजारांहून अधिक घरकुलांची निर्मिती सुरू आहे. यासाठी काही वर्षांपूर्वी सुमारे ४० हजार नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. मात्र कालांतराने प्रतिसाद कमी मिळाल्याने त्यापैकी केवळ ५२०० जणांनी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण केली. त्यातून ५१७७ अर्ज पात्र ठरले आणि अखेरीस ४७७८ लाभार्थीची निवड लकी ड्रॉद्वारे करण्यात आली.

या निवड झालेल्या लाभार्थीना ३२२.७० चौरस फूट क्षेत्रफळाचे घरकुल देण्यात येणार आहे. तीसगाव, पडेगाव व सुंदरवाडी येथील घरांसाठी अंदाजे ९.२६ ते ९.४४ लाख रुपये, तर हर्सल प्रकल्पातील घरांसाठी सुमारे ११.९९ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या २.५ लाख रुपयांच्या अनुदानामुळे प्रत्यक्ष खर्च काही प्रमाणात कमी होणार आहे.

दरम्यान, लकी ड्रॉ नंतर लाभार्थीना कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले असून, यासाठी महापालिकेच्या संबंधित विभागात मोठी गर्दी होत आहे. मात्र कागदपत्रांसोबतच एक लाख रुपयांचे डिपॉझिट भरण्याची अट घालण्यात आल्याने अनेक लाभार्थी अडचणीत सापडले आहेत. ही अट पूर्वी स्पष्ट करण्यात आली नव्हती, असा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. तसेच प्रशासनाने डिपॉझिटची अट शिथिल करावी किंवा पर्यायी सवलतीचा विचार करावा, अशी मागणी लाभार्थीकडून जोर धरत आहे.

आमचा विचार करा

हातावर पोट असलेल्या कुटुंबांसाठी एकरकमी एक लाख रुपये भरणे कठीण असल्याचे लाभार्थांचे म्हणणे आहे. आम्ही १०-२० हजार रुपये तात्काळ भरू शकतो, उर्वरित रक्कम हप्त्यांमध्ये देण्याची संधी द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. काहींनी कर्ज घेऊन पुढील हप्ते भरण्याची तयारी दर्शवली असली, तरी प्रारंभीची मोठी रक्कम भरणे जड जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT