Provide crop loans to farmers who have received loan waivers
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगामाचे पीक पूर्णतः निघून गेले आहे. या संकटाच्या काळात सरकारसोबतच बँकांनीही शेतकऱ्यांना सहकार्याची भूमिका घ्यावी. तसेच ज्या शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला. त्यांना तातडीने पुढील हंगामासाठी पीक कर्ज द्या, असे आदेश सोमवारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी सर्व बँकांच्या प्रतिनिधींना दिले. तसेच कर्ज थकीत असल्याने सक्तीने वसुली करू नये, अशी सूचनाही केली.
राज्यात यंदा कमी पावसामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या अडचणीत प्रत्येकानेच सहकार्य करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी बैठकीत म्हणाले. जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मंजूर करून त्याचे तातडीने वितरण करावे.
ज्या बँक शाखेत कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे, त्याच शाखेमार्फत संबंधित शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश आहेत. शेतीविषयक कर्ज प्रस्ताव शाखास्तरावर अनावश्यकपणे प्रलंबित ठेवू नयेत. पात्र प्रस्तावांचा नियमित आढावा घेऊन त्यांचा तातडीने निपटारा करावा. असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.