Property worth lakhs, including jewellery worth 10 tolas, was looted after breaking into a bungalow
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: दिवाळीच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर पुंडलिकनगरनंतर आता छावणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मिटमिटा भागातील दिशा निसर्ग सोसायटी, हाश्मी पार्क येथे भंडारपालाच्या बंगल्यातील बाजारभावानुसार दागिने, रोख असा तब्बल ११ लाखांचा ऐवज लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे छावणी पोलिसांच्या निष्क्रियतेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ही घटना शनिवारी (दि. २५) मध्यरात्री मिटमिटा भागातील दिशा निसर्ग सोसायटी, हाश्मी पार्क येथे घडली.
फिर्यादी जयसिंग शिवसिंग गोमलाडू (४३, रा. प्लॉट क्र ३६, भाऊ निवास, दिशा निसर्ग सोसायटी, हाश्मी पार्क, मिटमिटा) यांच्या तक्रारीनुसार, ते पाच वर्षांपासून कुटुंबासह राहतात. दिवाळीनिमित्त बुधवारी त्यांची पत्नी माहेरी कन्नड येथे तर जयसिंग हे मूळगावी संज्जरपूर वाडी येथे गेले होते. शुक्रवारी जयसिंग हे सकाळी साडेआठच्या सुमारास घरी परत येऊन ड्युटीवर गेले. शनिवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास घराला कुलूप लावून ते मूळगावी परत गेले.
रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घरमालक ईश्वर पवार यांनी त्यांना फोन करून घराच्या गेटचे कुलूप तुटलेले असल्याचे सांगितले. पवार यांनी आत जाऊन पहिले तेव्हा दोन्ही दाराचे कडी-कोयंडे, कुलूप तुटलेले दिसले. घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसताच त्यांनी जयसिंग यांना तसे कळविले. त्यांनी तत्काळ घराकडे धाव घेतली. घरात जाऊन पहिले तर दागिने, रोख रक्कम चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक नागवे करत आहेत.
छावणी ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अभाव
मिटमिटा भागात गुरुवारी चोरट्याने कासलीवाल तारांगण येथील सुशील पवार यांचा फ्लॅट फोडून १ लाख ३३ हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले होते. त्यानंतर शनिवारी मध्यरात्री मिटमिटा भागातच पुन्हा धाडसी घरफोडी करून लाखोंचा ऐवज लांबविला. छावणी पोलिस ठाण्यात सध्या पोलिस निरीक्षक दर्जाचे वरिष्ठ अधिकारी नसल्याने गस्त, तपास आणि नियंत्रणात शिथिलता आल्याची चर्चा आहे. पोलिसांची रात्र गस्त कुचकामी ठरल्याने चोरट्यांना मोकळे रान मिळाल्याचे नागरिकांचे मत आहे. सलग दोन घरफोड्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, नागरिकांनी पोलिस प्रशासनाने गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे.
हा ऐवज चोरीला
३०.५ ग्रॅमचे गंठण, १९ ग्रॅमचे सोन्याचे गंठण, १५ ग्रॅमचे तीन मंगळसूत्र, ४.५ ग्रॅमची चेन, ३ ग्रॅमचे कानातील टॉप्स, ५ ग्रॅमचे गंठण, १५.५ ग्रॅमचे नेकलेस, ८ ग्रॅमचे झुंबके, ६ ग्रॅमचे कानातील दोन वेल, ६० हजारांची रोकड असा बाजारभावानुसार सुमारे ११ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.