Accident Traps : वेरूळ-चिंचोली मार्गावरील खड्डे बनले अपघाताचे सापळे File Photo
छत्रपती संभाजीनगर

Accident Traps : वेरूळ-चिंचोली मार्गावरील खड्डे बनले अपघाताचे सापळे

खुलताबाद तालुक्यातील वेरूळ-आखतवाडा-चिंचोली या महत्त्वाच्या मार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Potholes on the Verul-Chincholi road have become accident traps

वेरूळ, पुढारी वृत्तसेवा : खुलताबाद तालुक्यातील वेरूळ-आखतवाडा-चिंचोली या महत्त्वाच्या मार्गाची अक्षरशः चाळण झाली असून, रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या अर्धा फूट खोल खड्यांमुळे वाहनधारकांचा प्रवास धोकादायक बनला आहे.

विशेषतः वेरूळ ते आजमपूर फाटा या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने दररोज या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे.

वेरूळ ते आजमपूर फाटा हा मार्ग पिंपरी, निरगुडी, तिसगाव, आजमपूरसह अनेक गावांना तालुक्याच्या मुख्यालयाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. दररोज शेकडो वाहनांची या मार्गावरून वर्दळ असते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालविणे म्हणजे जीवघेणी कसरत ठरत आहे. अनेक ठिकाणी खड्ड्यांची खोली अर्धा फूटांहून अधिक असल्याने दुचाकीस्वारांना विशेषतः मोठा धोका निर्माण झाला आहे.

पावसाळा तोंडावर आला असताना या रस्त्याची अवस्था अधिकच चिंताजनक बनली आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रस्त्याचा अंदाज येणे कठीण होणार असून अपघातांची शक्यता आणखी वाढणार आहे. त्यामुळे हा मार्ग रस्त्यापेक्षा एखाद्या तलावाचे किंवा पाणंद रस्त्याचे स्वरूप धारण करेल, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

वाहनधारकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून अनेकदा वाहनांचे नुकसानही होत आहे. शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका, शेतमाल वाहतूक करणारी वाहने तसेच सर्वसामान्य नागरिकांना या समस्येचा फटका बसत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाकडे अनेकदा मागणी करूनही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या मार्गाच्या दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घेण्यात यावे. नवीन रस्त्याचे काम तत्काळ शक्य नसल्यास किमान पावसाळ्यापूर्वी सर्व खड्डे दर्जेदार पद्धतीने बुजवून मार्ग वाहतुकीस सुरक्षित करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

रस्त्याची पावसाळ्यापूर्वीच दुरुस्ती न झाल्यास भविष्यात गंभीर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT