Zombie drug danger | झोम्बी ड्रगचा धोकादायक विळखा

Zombie drug danger |
Zombie drug danger | झोम्बी ड्रगचा धोकादायक विळखा
Published on
Updated on

कावेरी गिरी

चंदीगड, बेंगळुरू, मीरा भाईंदर या ठिकाणच्या काही व्हिडीओ क्लिप्स अलीकडेच सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या. यामध्ये तरुण नशेत (ड्रग घेतल्यासारखे) वाटत होते. एका जागी तासन् तास न हालता उभे राहिल्याचे चित्र दिसल्यामुळे अनेक जण म्हणू लागले की, ते झोम्बी ड्रगच्या विळख्यात आहेत. याबद्दलचा तपास सुरू आहे; पण झोम्बी ड्रगचा परिणाम मात्र भयावह आहे.

अलीकडच्या काळात ‘झोम्बी ड्रग’ हा शब्द वारंवार ऐकायला मिळतो. सोशल मीडियावर फिरणारे व्हिडीओ, बातम्यांमधील धक्कादायक चित्रण आणि तरुणांमध्ये वाढत चाललेली उत्सुकता या सगळ्यामुळे या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. झोम्बी ड्रग हा एखाद्या विशिष्ट औषधाचा अधिकृत वैज्ञानिक शब्द नसून, सामान्य भाषेत वापरला जाणारी एक संज्ञा आहे. प्रामुख्याने झायलाझिन (Xylazine) किंवा त्यासारख्या इतर घातक रसायनांचा वापर करून तयार होणार्‍या मिश्रणांना हे नाव दिले जाते. सुरुवातीला मोठ्या प्राण्यांना गुंगी आणण्यासाठी वापरले जाणारे हे ‘झोम्बी ड्रग’ आता मानवांसाठी एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या बनले आहे.

झोम्बी ड्रगचे सर्वात भयावह वैशिष्ट्य म्हणजे त्याचा परिणाम. हे पदार्थ घेतल्यावर व्यक्तीचे शरीर जणू जिवंत असले, तरी प्रतिसाद न देणारे असे होते. चालणे, बोलणे, समतोल राखणे अशा सर्व गोष्टींवर परिणाम होतो. काही वेळा व्यक्ती वाकड्यातिकड्या स्थितीत उभी राहते किंवा चालताना असंतुलित दिसते. त्यामुळेच झोम्बी ही उपमा दिली गेली आहे. झॉयलाझिन ड्रगचे परिणाम खूप तीव्र आणि दीर्घकाळ टिकणारे असतात, ज्यामुळे वापरकर्ते निश्चल, झोम्बीसारख्या अवस्थेत जातात. झोप येणे, मेंदूची क्रिया मंदावणे, स्नायू शिथिल होणे, उच्च रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे , हृदयाची गती कमी होणे, शरीराचे तापमान कमी होणे, श्वासोच्छवास मंदावणे, त्वचेवर व्रण, फोड किंवा अल्सर होणे, उतींच्या जखमा सुजणे, तोंड कोरडे पडणे, केंद्रीय मज्जासंस्थेची क्रिया मंदावणे, कोमा (अचेतन अवस्था), हृदयाच्या ठोक्यांमधील अनियमितता असे दुष्परिणाम होतात.

या ड्रगचा विळखा कसा बसतो, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. सुरुवातीला कुतूहल, मित्रांचा दबाव किंवा तात्पुरता आनंद मिळवण्याची इच्छा या कारणांनी अनेकजण अशा पदार्थांचा प्रयोग करतात. काही वेळा हे पदार्थ इतर ड्रग्जमध्ये मिसळलेले असतात आणि वापरणार्‍याला त्याची कल्पनाही नसते. सुरुवातीला थोडीशी रिलॅक्सेशन, वेदना कमी झाल्यासारखे वाटणे किंवा वास्तवापासून दूर गेल्यासारखी भावना निर्माण होते; पण हळूहळू शरीर आणि मेंदू यावर त्याचे नियंत्रण वाढू लागते. एकदा सवय लागली की, त्याशिवाय राहणे कठीण होते आणि व्यसनाचा विळखा घट्ट होत जातो.

शरीरावर होणारे परिणाम अत्यंत गंभीर असतात. झोम्बी ड्रगमुळे त्वचेवर जखमा होणे, त्या जखमा भरून न येणे, त्वचा कुजायला लागणे असे परिणाम दिसून येतात. काही प्रकरणांमध्ये इतकी गंभीर इन्फेक्शन होते की, शस्त्रक्रिया करून भाग काढावा लागतो. याशिवाय श्वासोच्छ्वास मंदावणे, हृदयाचे ठोके कमी होणे, रक्तदाब घटणे असे परिणामही संभवतात. मेंदूवर परिणाम झाल्यामुळे स्मरणशक्ती कमी होणे, निर्णय क्षमता बिघडणे आणि मानसिक अस्थिरता वाढणे हेही दुष्परिणाम आहेत. मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम तितकाच धोकादायक आहे. झोम्बी ड्रग घेतल्यानंतर व्यक्तीला वास्तव आणि कल्पना यामधील फरक समजेनासे होतो. भीती, संशय, नैराश्य, चिडचिड या भावना तीव्र होतात. काही वेळा व्यक्ती स्वतःलाच किंवा इतरांना इजा पोहोचवू शकते. त्यामुळे हे केवळ शारीरिक नाही, तर सामाजिक आणि मानसिक पातळीवरही मोठे संकट आहे.

या पार्श्वभूमीवर जागरूकता ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कोणत्याही अनोळखी किंवा संशयास्पद पदार्थांपासून दूर राहणे ही सर्वात पहिली पायरी आहे. ‘फक्त एकदाच ट्राय करतो’ ही मानसिकता टाळणे महत्त्वाचे आहे. कारण, व्यसनाची सुरुवात अनेकदा अशाच विचारांपासून होते. मित्रपरिवाराची निवड करताना सावधगिरी बाळगणे, चुकीच्या सवयींकडे ढकलणार्‍या वातावरणापासून दूर राहणे आवश्यक आहे. पालक आणि कुटुंबीयांची भूमिकाही येथे महत्त्वाची ठरते. मुलांच्या वागण्यात अचानक बदल दिसणे, अभ्यास किंवा कामात रस कमी होणे, एकटेपणा वाढणे, पैशांची गरज अचानक वाढणे हे काही संकेत असू शकतात. अशावेळी रागावण्याऐवजी संवाद साधणे, समजून घेणे आणि योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. शाळा आणि महाविद्यालयांनीही या विषयावर मार्गदर्शन सत्रे आयोजित करून विद्यार्थ्यांना योग्य माहिती देणे आवश्यक आहे.

स्वतःची काळजी घेण्यासाठी काही साधे; पण प्रभावी उपाय करता येतात. नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि सकारात्मक छंद यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहते. तणाव हाताळण्यासाठी ध्यान, योग किंवा इतर रिलॅक्सेशन तंत्राचा उपयोग होऊ शकतो. कोणाला आधीच व्यसनाची सवय लागली असेल, तर तज्ज्ञांची मदत घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. डॉक्टर, समुपदेशक किंवा व्यसनमुक्ती केंद्र यांची मदत घेऊन हळूहळू या विळख्यातून बाहेर पडता येते. समाज म्हणूनही आपली जबाबदारी आहे. अशाप्रकारच्या ड्रग्जचा प्रसार रोखण्यासाठी कडक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी आवश्यक आहे. पोलिस, आरोग्य यंत्रणा आणि सामाजिक संस्था यांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे.

झोम्बी ड्रग हा केवळ एक वैयक्तिक समस्या नसून, तो सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे. एका व्यक्तीचे व्यसन संपूर्ण कुटुंबावर आणि समाजावर परिणाम करते. त्यामुळे या समस्येकडे त्यांची समस्या म्हणून न पाहता आपली समस्या म्हणून पाहणे आवश्यक आहे. या विषयाकडे भीतीने नव्हे, तर सजगतेने पाहणे महत्त्वाचे आहे. योग्य माहिती, जागरूकता आणि ठाम निर्णय क्षमता याच्या जोरावर आपण या धोकादायक प्रवाहापासून स्वतःलाही आणि आपल्या आसपासच्या लोकांना वाचवू शकतो. थोडक्यात सांगायचे, तर झोम्बी ड्रगपासून दूर राहणे हेच सर्वात सुरक्षित आणि शहाणपणाचे पाऊल आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news