Polling stations will be re-determined
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात २३९४ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले होते. मात्र आता राज्य निवडणूक आयोगाने मतदान केंद्र निश्चितीच्या निकषांमध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मतदान केंद्रांची नव्याने निश्चिती होणार आहे.
याआधी एका मतदान केंद्रावर सरासरी आठशे ते नऊशे मतदार होते. नव्या निकषानुसार एका मतदान केंद्राला सरासरी अकराशे मतदार जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या कमी होऊन निवडणुकीत मनुष्यबळ आणि ईव्हीएम कमी लागणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने जुलै महिन्यात मराठवाड्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला होता. त्यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील मतदार, प्रस्तावित मतदान केंद्र यांची सविस्तर माहिती सादर केली. १ जुलै २०२५ च्या मतदारयाद्या विचारात घेऊन आणि आयोगाचे त्यावेळचे निकष विचारात घेऊन मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आली होती.
आधीच्या निवडणुकीवेळी एकेका मतदान केंद्रावर सरासरी हजार ते बाराशे मतदार होते. परंतु मतदारांना रांगेत जास्त वेळ ताटकळ थांबावे लागू नये म्हणून निवडणूक आयोगाने एका मतदान केंद्रावर जास्तीत जास्त नऊशे मतदारच ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात २३९४ मतदान केंद्र निश्चित केले होते. मात्र आता राज्य निवडणूक आयोगाने मतदान केंद्र निश्चितीच्या निकषांमध्ये पुन्हा बदल केला आहे. आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी एका मतदान केंद्रास सरासरी अकराशे मतदार जोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील मतदान केंद्रांची नव्याने निश्चिती केली जाणार आहे.
सन २०१७ च्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवेळी जिल्ह्यात १९६० मतदान केंद्र होते. यावेळी आयोगाचे निर्देश आणि जिल्ह्यातील वाढलेली मतदारसंख्या या दोन्ही कारणांमुळे जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या २३९६ वर गेली होती. परंतु आता निकष बदलामुळे ही संख्या दोन हजारांवर येणार आहे. आगामी निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मतदारांची संख्या एकूण १८ लाख ७० हजार ५८७ इतकी असणार आहे.
प्रशासनाने काही दिवसांपूर्वी केलेल्या मतदान केंद्र निश्चितीनुसार यावेळी कनड तालुक्यात सर्वाधिक ७९ मतदान केंद्र वाढले होते. त्यापाठोपाठ गंगापूर तालुक्यात ७७, वैजापूर तालुक्यात ६९, फुलंब्री तालुक्यात ५०, पैठण तालुक्यात ४१, सोयगाव तालुक्यात ३५, छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ३०, खुलताबाद तालुक्यात २८ आणि सिल्लोड तालुक्यात २७ मतदान केंद्रांची भर पडली होती. परंतु आता निकप बदलल्यामुळे या संख्येत बदल होणार असून, ही संख्या कमी होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडे पुरेशा ईव्हीएम मशीन उपलब्ध नाहीत. त्यामुळे शेजारच्या राज्यांकडून काही मशीन उसनवारीवर घेण्यात येणार आहेत. तर काही मशीन या नव्याने खरेदी केल्या जाणार आहेत. तरीदेखील राज्यातील सर्वच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित असल्याने त्या एकाच टप्प्यात होणार असल्याने ईव्हीएमचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमी ईव्हीएम मशीन लागाव्या म्हणूनच मतदान केंद्रांच्या निकषांमध्ये बदल करण्यात आला आहे. यासोबतच मतदान केंद्रांची संख्या घटल्याने निवडणुकीसाठी मनुष्यबळही कमी लागणार आहे.