Sambhajinagar News : शहानूरवाडीतील 'त्या' वादग्रस्त जागेचे - पोलिस महसुली रेकॉर्ड मागविणार file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : शहानूरवाडीतील 'त्या' वादग्रस्त जागेचे - पोलिस महसुली रेकॉर्ड मागविणार

तपासाला वेग : फरार आरोपीचा शोध सुरू; तक्रारीत नावे असलेल्या मोठ्या बिल्डरांच्या अडचणी वाढणार

पुढारी वृत्तसेवा

Police will demand revenue records of 'that' disputed place in Shahanurwadi

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बनावट कागदपत्रांचे आधारे हस्तांतरित शहानूरवाडीतील त्या वादग्रस्त जागेवर मनजीत प्राइडकडून वन वर्ल्डच्या नावाने भव्य प्रकल्पात शेकडो फ्लॅट, दुकानांचा टोलेजंग इमारती उभारण्यात येत आहे. शहरातील हा सर्वांत मोठा निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प असून अनेक ग्राहकांनी कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे.

दरम्यान, या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने आजघडीला ही जागा वादग्रस्त ठरली आहे. फिर्यादीने १४ जणांनी नावे तक्रारीत दिली आहेत. मात्र, सध्या केवळ गंगाधर गिरधारीलाल ऊर्फ लाल राजपूत परदेशी या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. उस्मानपुरा पोलिसांनी तपासाला वेग दिला असून फरार आरोपीचा कसून शोध सुरू आहे. विशेष म्हणजे या जागेसंदर्भात महसूल विभागाला पत्रव्यवहार करून आजवरचे सर्व रेकॉर्ड, कागदपत्रे मागविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अधिक माहितीनुसार, शहानूरवाडी येथील ४ हेक्टर ७६ आर जमिनीचा मूळ कुळधारक बदलून बनावट अर्ज, शपथपत्र आणि फेरफाराच्या आधारे जमीन हस्तांतरित केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात श्रीकांत कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीत १४ जणांची नावे दिली आहेत. त्यातील गंगाधर परदेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अन्य १३ जणांची यात काय भूमिका आहे याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

गुरुतेग बहाद्दर शैक्षणिक संस्थेसह अन्य व्यक्तींच्या माध्यमातून जमिनीचे व्यवहार झाले. आजघडीला वादग्रस्त असलेल्या या जागेवर मनजित प्राइड ग्रुपचे नितीन बगडिया व नवीन बगडिया यांचा वन वर्ल्ड हा पाच २१ मजली टोलेजंग इमारतींचा निवासी व कमर्शियल प्रकल्प उभारण्यात येत आहे.

या जागेसंदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर उस्मानपुरा पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला गती दिली आहे. या जमिनीच्या मूळ मालकी हक्कापासून ते आजवर झालेल्या सर्व खरेदीखत, फेरफार नोंदी आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी पोलिस महसूल विभागाशी पत्रव्यवहार करत आहेत. शहानूरवाडीतील या जमिनीचे आजवरचे सर्व जुने रेकॉर्ड, मूळ फाईल्स आणि महसुली नोंदी अधिकृतपणे मागविण्यात येत असून, या बनावट फेरफार प्रकरणात आणखी कोणाकोणाचा सहभाग होता का, याचाही शोध घेतला जाणार आहे. मोठ्या बिल्डरांचीही भूमिका पोलिस तपासणार आहेत.

ग्राहकांचे कोट्यवधी अडकले; गुंतवणूकदारांची झोप उडाली

साडेतीन वर्षांहून अधिक कालावधीपासून या प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. शहर-जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातील असंख्य ग्राहकांनी या प्रकल्पात घरे व दुकानांमध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र, प्रकल्पाची जागाच सद्यस्थितीत वादग्रस्त ठरल्याने गुंतवणूकदार संभ्रमात पडले असून खरेदी केलेल्या ग्राहकांची झोप उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT