

On the occasion of Vijayadashami, a traditional Shri Balaji Ratha procession will be organized in the Karnapura temple area today.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : विजयादशमीनिमित्ताने आज मंगळवारी (दि.२०) येथील कर्णपुरा मंदिर परिसरात दरवर्षीच्या परंपरेनुसार श्रीबालाजी रथ ओढून उत्साहपूर्ण वातावरणात सीमोल्लंघन केले जाणार आहे. यावेळी दर्शनासाठी नेहमीप्रमाणेच भाविकांची अलोट गर्दी उसळणार असल्याने मंदिर विश्वस्तांनी जय्यत तयारी केली आहे. सायंकाळी श्रीबालाजी मंदिरात महाआरतीनंतर गोविंदा.. गोविंदाच्या जयघोषात रथ यात्रा निघणार आहे.
शहराचे ग्रामदैवत असलेल्या कर्णपुरा देवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्ताने दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली. दुष्काळाच्या सावटातही अगदी पहिल्या माळेपासून सलग नऊ दिवस भल्या पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत दररोज हजारो भाविक देवीच्या चरणी नतमस्तक झाले. पावसातही भक्तांची उत्स्फूर्त गर्दी झाली.
यासह येथील देवी यात्रा उत्सवालाही दरवर्षीप्रमाणे मोठा प्रतिसाद मिळाला. लहान-मोठ्या सर्वांनीच यात्रेचा आनंद लुटला. यात्रा उत्सवाचा मंगळवारी शेवटचा दिवस असून, कर्णपुरा परिसरात श्रीबालाजी रथ ओढून सीमोल्लंघनही केले जाणार आहे. यासाठी मंदिर विश्वस्तांकडून तयारी करण्यात आली असून, घट हलविल्यानंतर सांयकाळी श्रीबालाजींची महाआरती होईल.
त्यानंतर गोविंदा.., गोविंदा.. व्यंकटरमणाच्या निनादात रथ ओढण्यास सुरुवात होणार आहे. यावेळी हजारो भाविकांसह शहरातील मंत्री, आजी-माजी खासदार, आमदार आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सीम्मोलंघनाचा हा सोहळा भक्तीभावासह उत्साहात पार पडणार आहे.