

1,000 new transformers sanctioned for each district for agricultural use during drought conditions
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमध्ये बळीराजाला मोठा दिलासा देणारा निर्णय शासनाने घेतला आहे. वितरण रोहित्र, स्पेशल डिझाईन ट्रान्सफॉर्मर आणि कॅपॅसिटर बँक खरेदी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी नवीन एक हजार रोहीत्र मंजूर करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी आणि ग्रामीण भागात योग्य दाबाने सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी वीज वितरण यंत्रणेच्या सक्षमीकरणाचे कामे युद्धपातळीवर सुरू होणार आहेत.
यंदाच्या कमी पर्जन्यमानामुळे शासनाने राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. महावितरणकडून राज्यात सुमारे ४७लाखांवर कृषी ग्राहकांना विविध क्षमतेच्या वितरण रोहित्रांद्वारे वीजपुरवठा केला जात आहे.
दुष्काळी परिस्थितीत हा वीजपुरवठा सुरळीत आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम राहणे आवश्यक असल्याने राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात वीज यंत्रणा सक्षम करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य शासनाने मंजूर केलेल्या विशेष निधीच्या माध्यमातून तीन महत्वाचे कामे तातडीने करण्यात येणार आहेत. यामध्ये आवश्यकतेनुसार नवीन वितरण रोहित्रांची (ट्रान्सफॉर्मर्स) खरेदी केली जाईल. त्याद्वारे अतिभारित (ओव्हरलोड) किंवा नादुरुस्त रोहित्र बदलून सिंचनातील अडथळे दूर करण्यात येतील.
यासोबतच कृषी वीजवाहिनीवर असलेल्या घरगुती वीज ग्राहकांना आणि शेतातील घरांना २४ तास सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी आवश्यकतेनुसार सिंगल फेज आणि थ्री-फेजचे नवीन स्पेशल डिझाईन ट्रान्सफॉर्मर (एसडीटी) बसवले जाणार आहेत. नवीन तसेच आवश्यकतेनुसार कपॅसिटर बँकेची खरेदी करण्यात येणार आहेत.
शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा फायदा होणार
दुष्काळी परिस्थितीत हा वीजपुरवठा सुरळीत आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम राहणे आवश्यक आहे. शासनाच्या या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना कृषी वीजवाहिनीवर असलेल्या घरगुती वीज ग्राहकांना आणि शेतातील घरांना २४ तास सुरळीत वीजपुरवठा होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा फायदा होणार आह. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.