Drug Smugglers : ड्रग्ज तस्करांचे अवैध घरे जमीनदोस्त करण्यासाठी पोलिसांचे मनपाला स्मरणपत्र file photo
छत्रपती संभाजीनगर

Drug Smugglers : ड्रग्ज तस्करांचे अवैध घरे जमीनदोस्त करण्यासाठी पोलिसांचे मनपाला स्मरणपत्र

घरातून नशा विकणाऱ्या गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्याची तयारी सुरू

पुढारी वृत्तसेवा

Police send reminder to Municipal Corporation to demolish illegal houses of drug smugglers

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराला अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी हाती घेतलेल्या ड्रग्ज फ्री सिटी मोहिमेला निर्णायक टप्प्यावर नेण्यासाठी आता ड्रग्ज तस्करांच्या अनधिकृत अड्ड्यांवर कारवाईची गरज निर्माण झाली आहे. शहरातील सराईत तस्करांनी घरातूनच सुरू केलेले नशेचे जाळे कायमस्वरूपी उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा चालवण्याचे नियोजन करण्यात आले होते. पावसाळ्यामुळे थांबलेली ही प्रक्रिया आता पावसाळा संपल्यानंतर पुन्हा सुरू व्हावी आणि तस्करांच्या मुळावर घाव घालता यावा, यासाठी पोलिस दलाच्या वतीने महापालिका प्रशासनाला स्मरणपत्र पाठवून पुढील कारवाई करण्यासाठी कळविले आहे.

शहरात पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेत शेकडो कारवाया करून अनेक कुख्यात तस्करांच्या टोळ्या गजाआड केल्या आहे. मात्र, जामिनावर सुटलेले गुन्हेगार पुन्हा आपल्या घरांमधूनच छुप्या पद्धतीने अमली पदार्थांची विक्री सुरू ठेवत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. केवळ गुन्हे दाखल करून हे रॅकेट पूर्णपणे संपवता येत नसल्याने, तस्करांचे आर्थिक आणि मानसिक कंबरडे मोडण्यासाठी त्यांनी तयार केलेले सुरक्षित अड्डेच उद्ध्वस्त करण्याची रणनीती आखण्यात आली. ज्या घरांतून नशेचा हा काळा धंदा चालवला जातो, ती घरे अनधिकृत असल्यास ती जमीनदोस्त करावीत, अशी पोलिसांची स्पष्ट भूमिका आहे. यामुळे ड्रग्जमुक्त शहर मोहिमेला मोठे बळ मिळणार आहे.

आता प्रत्यक्ष कारवाईची प्रतीक्षा

दरम्यान, पावसाळ्याच्या दिवसांत निष्कासनाची कारवाई करणे शक्य नसल्याने नियमानुसार ही प्रक्रिया सप्टेंबर महिन्यापर्यंत थांबवण्यात आली होती. आता पावसाळा संपून मुदतही पूर्ण झाली आहे. त्यामुळे संबंधित ड्रग्ज तस्करांच्या घराच्या कागदपत्रांची पडताळणी करून, जी बांधकामे बेकायदेशीर व विनापरवाना आढळतील त्यांच्यावर प्रत्यक्ष निष्कासनाची कारवाई व्हावी, यासाठी पोलिसांकडून मनपाला स्मरणपत्र देण्यात आले आहे. पोलिस आणि महापालिका या दोन्ही यंत्रणांच्या संयुक्त समन्वयातून शहरातील ड्रग्ज तस्करांचे अड्डे भुईसपाट झाल्यास शहरातील तरुणाईला उद्ध्वस्त करणाऱ्या या नशेच्या व्यापाराला मोठा चाप बसणार आहे.

फेब्रुवारीत दिली होती ६० तस्करांची यादी

या मोहिमेचा भाग म्हणून पोलिसांनी १६ फेब्रुवारी रोजी ६० सराईत ड्रग्ज तस्करांची घराच्या पत्त्यासह सविस्तर यादी महापालिका प्रशासनाकडे सुपूर्द केली होती. मनपाच्या अतिक्रमण विभागानेही यावर तातडीने पावले उचलत २३ फेब्रुवारीपर्यंत ३२ तस्करांच्या घरांवर नोटिसा बजावल्या होत्या. संबंधित घरांचे बांधकाम अधिकृत आहे की अनधिकृत, याची कागदपत्रे व परवानगीचे पुरावे सादर करण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली होती. नोटिसा बजावलेल्या तस्करांमध्ये अशपाक पटेल, सय्यद फैजल ऊर्फ तेजा, पाचुंदे दाम्पत्य, अजय ठाकूर, अनिल माळवे, ज्ञानेश्वर यादव आणि दाऊद पठाण समावेश आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT