वैजापुरात कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा file photo
छत्रपती संभाजीनगर

वैजापुरात कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा

डांबून ठेवलेल्या २२ गोवंशांची मुक्तता, चार जणांविरुध्द पोलिस ठाण्यात गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

Police Raid Slaughterhouse in Vaijapur

वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : शहरापासून थोड्याच अंतरावर बेलगाव रस्त्यालगत सुरू असलेल्या एका कत्तलखान्यावर वैजापूर पोलिसांनी छापा टाकून कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या २२ गोवंश जातीच्या जनावरांची सुटका केली. शनिवारी (दि.४) रात्रीच्या सुमारास पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी असलम कुरेशी (रा. वैजापूर) याच्यासह तीन अज्ञातांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर शहरालगत असलेल्या बेलगाव रोडवरील एका पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर गोवंश जातीची जनावरे डांबून ठेवली असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्यासह पथकाने शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास माहितीतील ठिकाणावर छापा टाकला.

या छाप्यात कत्तलीसाठी आणलेली २२ गोवंश जातीची जनावरे पथकाला आढळून आले. अत्यंत दाटीवाटीने आणि क्रूरपणे डांबून ठेवलेल्या अवस्थेत जनावरे होती. दरम्यान त्याठिकाणी जमिनीवर मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले आढळून आले. शिवाय काही ड्रममध्ये जनावरांची शिंगे व चामडी साठवून ठेवल्याचेही पोलिसांना दिसले. यावेळी पथकाने २२ गोवंश जातीच्या जनावरांची सुटका करून ती गोशाळेत हलविण्यात आली.

याप्रकरणी पोउपनिरीक्षक युवराज पाडळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून असलम कुरेशी व इतर अज्ञाताविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्यासह उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे, युबराज पाडळे, पोलिस हेड कॉन्स्टेबल योगेश झाल्टे, किसन गवळी, अविनाश भास्कर, गणेश काळे, पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत गीते, प्रल्हाद जटाळे, अमोल कांबळे, नवनाथ केरे, अजित नाचन, गणेश कुलट आणि रणजीत चव्हाण यांच्या पथकाने केली.

या ठिकाणीही व्हायला हवी कारवाई

शहरातील गंगापूर रोड, शिवरई रोड परिसरात कत्तलखान्यासारखे प्रकार सुरू असल्याची चर्चा नेहमी सुरू असते. या पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणी तात्काळ तपास करून कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आता जोर धरू लागली आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT