Police raid on a gambling den in Bhendala area
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा गंगापूर तालुक्यातील भेंडाळा शिवारात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, सहा जणांना रंगेहाथ पकडून अटक केली. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन, चारचाकी व दुचाकी वाहने असा एकूण २४ लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ३ ते ४ आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाले आहेत.
शनिवारी (दि.२७) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयास माहिती मिळाली की, गंगापूर पोलिस ठाणे हद्दीतील भेंडाळा शिवारात, हॉटेल भेंडाळा कॅफेच्या पाठीमागील शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये जुगार सुरू आहे. या माहितीच्या आधारे डॉ. नीलेश पालवे यांनी तात्काळ कारवाईचे आदेश देत पोलिस निरीक्षक सलीम चाऊस (पो.स्टे. शिल्लेगाव), पोहवा बेदरे, पो.शि. व्ही. दाभाडे व कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे पथक रवाना केले.
पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेत रात्री साडेदहा वाजता छापा टाकला. पोलिसांना पाहताच काही जण पळून गेले; मात्र सहा जणांना घटनास्थळीच ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये यादव (रा. गंगापूर), शेख आशिफ शेख फारे (रा. छत्रपती संभाजीनगर), ब्रीकेश अनिल शिंदे, देवीलाल लक्ष्मण मंगुसे (रा. गोलवाडी), दत्तात्रय रामदास गवळी (रा. नेवासा) आणि विजय गायकवाड (रा. गंगापूर) यांचा समावेश आहे.
पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून मोबाईल फोन, रोख रक्कम, जुगाराचे पत्ते तसेच चार स्विफ्ट व फोर्ड फिगो कार आणि चार दुचाकी वाहने असा मोठ्या प्रमाणात मुद्देमाल आढळून आला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत २४ लाख ९७ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदर कारवाईदरम्यान बॅटरीच्या प्रकाशात ई-साक्ष प्रणालीद्वारे पंचनामा करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.