Police complaint filed over remarks made against MLA Bamb
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : गंगापूर पंचायत समिती कार्यालयासमोर शिक्षकांच्या आंदोलनादरम्यान आमदार प्रशांत बंब यांच्याविरोधात आक्षेपार्ह व बेताल वक्तव्य केल्याचा आरोप करीत पद्मकर इंगळे यांच्याविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या गंगापूर तालुका कार्यकारिणीने केली आहे.
१५ सप्टेंबर रोजी गंगापूर पंचायत समितीसमोर शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी आंदोलनात सहभागी विविध वक्त्यांनी आपापल्या भूमिका मांडल्या. दरम्यान, एका वक्त्याने आंदोलनाच्या मूळ विषयापासून दूर जात आमदार प्रशांत बंब यांच्याविरोधात अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याचा आरोप भाजपच्या निवेदनात करण्यात आला आहे.
या कथित वक्तव्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे आंदोलनस्थळी झालेल्या भाषणाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग तपासून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे. पोलिसांनी नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी भाजप तालुका कार्यकारिणीने केली आहे.
यावेळी प्रदीप पाटील, मधुकर वालतुरे, दीपक साळवे, रवींद्र चव्हाण, भाग्येश गंगवाल, विजय पानकडे, राकेश कळसकर, मारुती खैरे, आनंद पाटील, जाफर शेख, वसंत खताळ, अरुण लांडे, अत्तर जोहरी, राजेंद्र राठोड, कृष्णकांत व्यवहारे, अतुल रासकर, अरुण सागर, भारत पाटील, राहुल सटाले, भिकचंद कोठुळे, भागिनाथ साळुंखे, संदीप बोजवारे, ज्ञानेश्वर पवार, सतीश बारे, रामेश्वर पाटील, तेजस सोनवणे, मोहसीन शेख, गणेश पाटील, सोमनाथ शिंदे, सलमान शेख, योगेश चव्हाण, ऋषिकेश जाधव, रफिक पठाण, संजय अभंग, मनोज गायकवाड यांच्यासह भाजपचे लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते-
ज्येष्ठ शिक्षक नेत्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ? शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी दि. १५ सप्टेंबर रोजी पंचायत समितीसमोर झालेल्या आंदोलनात शिक्षकसंघाचे ज्येष्ठ नेते मधुकर वालतुरे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, त्यानंतर आमदार प्रशांत बंब यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनावेळी वालतुरे उपस्थित असल्याने शिक्षक व शिक्षकसंघाच्या वर्तुळात त्यांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाल्याची चर्चा आहे.