PM Modi praises Patoda village in 'Mann Ki Baat'
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : वाळूज महानगरातील आदर्श पाटोदा गावाने एक नवा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. २९) आपल्या ममन की बातफकार्यक्रमामध्ये पाटोदा गावाचा विशेष उल्लेख करून गावात राबवण्यात आलेल्या विविध शासकीय व सामाजिक उपक्रमांचे भरभरून कौतुक केले. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या या गौरवामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात पाटोदा गावाचा लौकिक वाढला आहे.
पाटोदा ग्रामपंचायतीने गावात स्वच्छता, सौर ऊर्जा, जलसंवर्धन, आरोग्य, महिला सक्षमीकरण, शिक्षण यासारख्या विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. त्यामुळेच या गावाला राज्यातील आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार मिळाला असून, राष्ट्रपती पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
यामुळे पाटोदा गावाचे नाव केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात झळकले आहे. या यशामुळे पाटोदा गाव देशभरातील आदर्श मॉडेल म्हणून उदयास आले असून, महाराष्ट्रातील तसेच अन्य राज्यांतील मंत्री, वरिष्ठ अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, विद्यार्थी तसेच अभ्यासक यांनी गावास भेटी दिल्या आहेत.
विशेष म्हणजे, विदेशातूनही काही मान्यवर प्रतिनिधींनी पाटोदा गावात येऊन उपक्रमांची पाहणी केली आहे. येत्या काळात या गावातील विविध योजनांचे मॉडेल देशातील अन्य गावांत राबवले जाणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. पाटोदा गावाने ज्या पद्धतीने लोकसहभागातून गावाचा सर्वांगीण विकास साधला, तो खऱ्या अर्थाने इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी मन की बात कार्यक्रमात पाटोदा गावात ग्रामपंचायतीने केलेल्या विकासकामाचे तोंडभरून कौतुक केले. त्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे मनापासून धन्यवाद. तसेच आम्ही केलेल्या कामाची दखल पंतप्रधान मोदी यांनी घेतली. ही गोष्ट आमच्यासह संपूर्ण गावासाठी कौतुकास्पद आणि अभिमानाची आहे.जयश्री किशोर दिवेकर, सरपंच, पाटोदा