

Sambhajinagar Work on vehicle inspection center in final stages
जे. ई. देशकर
छत्रपती संभाजीनगर पुढारी वृत्तसेवा : आरटीओ कार्यालयाच्या करोडी येथील नव्या इमारतीच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या स्वयंचलित वाहन निरीक्षण, परीक्षण केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून या केंद्रातून दररोज सुमारे २०० ते २५० वाहनांची तपासणी होणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी दिली.
स्वयंचलित वाहन चाचणी रिपोर्ट देणार्या केंद्राची उभारणीचे काम करोडी येथील आरटीओ कार्यालयाच्या नवीन इमारतीत सुरू असून, हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात या केंद्रातून वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. स्वयंचलित केंद्रामुळे फिटनेस प्रमाणपत्रात होणाऱ्या गडबडीवर नियंत्रण येणार आहे. त्याचबरोबर वाहनधारकांना योग्य रीतीने वाहन चालवता येते किंवा नाही याचीही तंतोतंत माहिती या यंत्रेणेमार्फत मिळणार आहे. ही यंत्रणा राज्य पातळीवर एकाच कंपनीकडून उभारण्यात येत आहे. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर मॅन्युअली कामकाजावर अवलंबून राहावे लागणार नाही. तसेच वाहन तपासणीचे कामही वेगाने होणार आहे.
सध्या दिवसभरात १०० ते १२० वाहनांची तपासणी होते. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर एकावेळेत चार वाहनांची तपासणी होणार आहे. यात दोन हेवी आणि दोन लााईट वाहनांचा समावेश राहणार आहे. यामुळे यात दुपटीने म्हणजे २०० ते २५० वाहनांची दररोज तपासणी होणार आहे. या स्वयंचलित केंद्रात हेड लाईट, ब्रेक टेस्ट, स्पीड, हॉर्न, स्टेअरिंग प्ले, जॉइंट प्ले, एअर प्रेशर, सस्पेंशन, व्हिजीबल फंक्शन, इलेक्टीकल चेकअप, शॉक प्रुफ अशा सुमारे ३९ तपासण्या या केंद्रात होणार आहेत. दुचाकी ते ट्रकची तपासणी याच केंद्रात होणार असल्याचीही माहितीही काठोळे यांनी दिली.