

Road Maveja given aggressive stance Chikalthana residents
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा आमच्या जागा अतिक्रमित नसून, आम्ही मावेजा घेणारच. आमचे पैसे दिले नाही तर आम्ही आंदोलन करणार, पैसे मिळाल्याशिवाय रस्ता होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा रविवारी (दि.२९) चिकलठाणा येथील रहिवाशांनी घेत महापालिकेला इशारा दिला.
चिकलठाणा येथील जागा आमच्या असून, आमचे अतिक्रमण नाही, आमच्या जागा गावठाणातील आहेत. महानगरपालिकेच्या स्थापनेपूर्वीपासून आमच्या जागा आहेत. आमच्याकडे बांधकाम परवानगीही आहे, असे असतानाही कोणतही नोटीस न देता, बांधकामे पाडली आहेत. तातडीने कारवाई करण्यामागील कारणे काय, असा प्रश्न उपस्थित करत आम्ही मावेजा घेणारच, आमचे पैसे दिले नाही तर आम्ही आंदोलन करणार पैसे मिळाल्याशिवाय रस्ता होऊ देणार नाही, असा इशारा चिकलठाणा येथील बापूसाहेब दहिहंडे, किसन दहिहंडे, रवी गावडे यांच्यासह नागरिकांनी दिला. यावेळी दहिहंडे म्हणाले की, आमचा विकासाला विरोध नाही. चिकलठाण्यात पाडापाडी करण्याची ही तिसरी वेळ आहे.
पुढून रस्ता आणि मागे विमानतळ असल्याने मध्ये आम्ही फसलो आहोत. प्रत्येक वेळी आम्ही आमच्या जमिनी दिल्या. कायदेशीर प्रक्रिया राबवून त्या घेण्यात आल्या, मात्र यावेळी कोणतीही नोटीस न देताच पाडापाडी करण्यात आली. गावठाणातील बांधकामे पाडण्याआधी पंचनामे करायला पाहिजे होते. आता इमारतींचे मूल्यांकन कसे काढणार? असा प्रश्रही रहिवाशांनी उपस्थित केला. तसेच आज कारवाईसाठी आलेल्या मनपाच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख संतोष वाहुळे यांना आम्ही कागदपत्रे, परवानग्या दाखविल्या, त्यांनी धार्मिकस्थळांसाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे, असे बापूसाहेब दहिहंडे यांनी सांगितले.
तत्कालीन विभागीय आयुक्त आणि प्रभारी मनपा आयुक्त दिलीप बंड, जिल्हाधिकारी संजीव जयस्वाल यांनी २००९-२०१० मध्ये रस्त्यासाठी जागा संपादित केल्या होत्या. त्यावेळी रीतसर नोटीस देऊन, पंचनामे करून आम्हाला मावेजा दिला, मात्र यावेळी तातडीने कारवाई करण्यामागील कारण काय हे आमच्यासमोर कोडे आहे. सुंदरवाडी आणि विमानतळासमोर फाईव्हस्टार हॉटेल्स झाल्या आहेत. आणखीही येणार आहेत, या हॉटेल्ससाठीच रस्ता रुंदीकरणाचा घाट घातला जात असल्याचा वास येत असल्याचे दहिहंडे यावेळी म्हणाले.
महापालिकेने मुकुंदवाडीनंतर केंब्रीज ते एपीआय 1 कार्नरपर्यंती अतिक्रमणे हटवली. ही कारवाई सुरूच राहणार असून, आज सोमवारी (दि.३०) सकाळी पैठण रोडवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य लेखा व वित्तीय अधिकारी तथा नियंत्रण अधिकारी अतिक्रमण विभाग संतोष वाहुळे यांनी दिली.
चिकलठाण्यातील कब्रस्तानसमोरील दोन मोठ्या 2 इमारतीची पाडापाडी सुरू होती. या इमारतीलच एका दुमजली इमारतीच्या तळमजल्यावर बैंक ऑफ इंडियाचे एटीएम आहे, हे एटीएम कधी पाडणार, अशी चर्चा नागरिकांमध्ये होत होती. मात्र हे एटीएम पाडण्यात आलेच नाही.
कारवाईसाठी मनपाकडून २० जेसीबी आणि ५ ॐ पोकलेनचा वापर सुरू आहे. त्यापैकी १२ जेसीबी मनपाचे असून, ८ जेसीबी हे भाडे तत्वावर घेतले आहेत. त्यांना प्रतितास २ हजार रुपये भाडे दिले जात आहे. तर पाचपैकी ३ पोकलेनसाठी प्रतितास अडीच हजार रुपये भाडे मनपाकडून दिले जात आहे.