पाटील यांना साबळे, घुगेंची ८७५४ मते मिळाली file photo
छत्रपती संभाजीनगर

Marathwada Graduates' Constituency Election : पाटील यांना साबळे, घुगेंची ८७५४ मते मिळाली

दुसऱ्या पसंतीतही पाटीलच आघाडीवर, पदवीधरांनी व्यक्त केली उघड नाराजी

पुढारी वृत्तसेवा

Patil received 8,754 votes from Sable and Ghuge

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा निकाल गुरुवारी पहाटे ५.१० वाजता अधिकृतरीत्या जाहीर झाला. यात पहिल्या पसंतीपासून आघाडीवर असलेले डॉ. प्रतापसिंह पाटील हे दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्येही आघाडीवरच राहिले. शेवटच्या टप्प्यात त्यांना शिवसेना उबाठाचे दिलीप घुगे यांची २२८५ तर सायलेंट किलर ठरलेले रविराज साबळे यांची ६४६९ अशी ८७५४ मते मिळाल्याने पदवीधरांनी उघडपणे सतीश चव्हाण यांना विरोध दर्शविल्याची चर्चा आहे.

मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत तरुण मतदारांनी सर्वाधिकप्रमाणात मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यात ग्रामीण भागातील तरुणांचा यात सर्वाधिक समावेश असल्याचेही मतमोजणीवेळी आढळलेल्या टीका टिपणीच्या चिठ्ठयांवरून दिसून आले. एवढेच नव्हे तर त्यात व्यक्त केलेला रोष हा सलग तीन वेळा आमदार राहिलेले चव्हाण यांच्याविरोधातच दिसून आला. मतदारांनी दुसऱ्या पसंतीच्या मत देताना देखील चव्हाण यांना दुर्लक्षित केल्याचे मतमोजणीतील आकडेवारीवरून दिसत आहे.

पहिल्या पसंतीत निवडून येण्यासाठी ८८ हजार ५५८ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. परंतु, प्रत्यक्षात एकाही उमेदवारांना हा कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे शेवटी बाद फेरीला सुरुवात करून दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यास सुरुवात झाली. यात ज्याला जास्त मते तो विजयी असे ठरते. परंतु, त्यासाठी तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारापर्यंतची मते मोजली जाते. या सर्वात कमी मते असलेल्या उमेदवारापासून बाद फेरीला सुरुवात झाली. यात पहिल्या बाद फेरीत चव्हाण यांना दुसऱ्या पसंतीचे २ तर पाटील यांना १ मत मिळाले. त्यानंतर शेवटून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला मिळालेली दुसरी पसंतीची ४ मते चव्हाण यांना तर २ मते पाटील यांना मिळाली. त्यानंतरच्या बाद फेरीत २ चव्हाण आणि ३ पाटील अशी मते मिळाली.

दरम्यान, एकएक बाद फेरीत होत ३७ उमेदवार बाद झाले. त्यांना मिळालेल्या दुसऱ्या पसंतीच्या मतांपैकी पाटील यांना ३१९१ मते मिळाली. तर चव्हाण यांना ३४४६ मते प्राप्त झाली. मात्र, असे असतानाही पाटील यांची १३ हजारांची आघाडी तोडणे शक्य नव्हते. शेवटी चौथ्या क्रमांकावर असलेले ठाकरे सेनेचे दिलीप घुगे यांच्या मतपत्रिकेतील दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी झाली. त्यातील २२८५ मते ही पाटील यांना मिळालेली होती. तर १८८१ मते ही चव्हाण यांच्या पारड्यात पडल्याने ते आणखीच पिछाडीवर गेले. अखेर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या साबळे यांची मतपत्रिका उघडून त्यातील दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात आली. त्यांच्या मतपत्रिकेतही दुसऱ्या पसंतीवर सर्वाधिक ६४६९ मते ही पाटील यांच्याच पारड्यत गेल्याने त्यांच्या मतांची संख्या ८५ हजार ८७६ वर गेली.

चव्हाण ६७७५२ मतांवर थांबले

सतीश चव्हाण यांना दुसऱ्या पसंतीत आघाडी मिळेल, अशी शक्यता कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत होती. परंतु, ३९ उमेदवारांची बाद फेरी झाल्यानंतर चव्हाण यांच्या मताची गाडी ६७ हजार ७५२ वरच थांबली. सलग ४५ तास चाललेल्या या मतमोजणीत १८ हजार १२४ मतांनी चव्हाण पराभूत झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT