

Major accident in Chikalthana as the slab of a large building collapses
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: जालना रस्त्यावरील चिकलठाणा आठवडी बाजारानजीक नव्याने उभारल्या जाणाऱ्या एका भव्य कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावरील पार्किंगचा स्लॅब अचानक पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळल्याची भीषण दुर्घटना गुरुवारी (दि. २९) रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली. सेंट्रिग प्लेट्सना दिलेला लोखंडी सपोर्ट सैल झाल्याने तो पूर्ववत करण्यासाठी खाली गेलेल्या चार मजुरांवरच हा स्लॅब कोसळला. यात तिघे मजूर जखमी अवस्थेत बाहेर पडण्यात यशस्वी झाले. मात्र चौथा मजूर लोखंडी सळ्या आणि ओल्या काँक्रिटच्या मलब्याखाली गाडला गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
घटनेनंतर महापालिकेचे अनिशमन दल आणि पोलिसांनी तातडीने दोन हायड्रोलिक क्रेनच्या साहाय्याने मलब्याखाली दबलेल्या मजुराचा शोध घेण्यासाठी मध्यरात्री उशिरापर्यंत युद्धपातळीवर बचाव मोहीम राबवली.
चिकलठाणा आठवडी बाजार लगत जालना रोडवर मुख्य रस्त्याला लागून असलेल्या या मोक्याच्या जागेवर गेल्या सहा महिन्यांपासून माजेद नावाच्या व्यक्तीच्या कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरू आहे. तळमजल्यावर प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी सुमारे २० फुटांचा स्लॅब टाकण्याचे काम गुरुवारी सायंकाळी वेगाने सुरू होते.
मात्र, कामादरम्यान स्लॅबच्या सेंट्रिंग प्लेट्सना आधार देण्यासाठी खालच्या बाजूला लावण्यात आलेला लोखंडी सपोर्ट सैल व खिळखिळा झाल्याचे कामगारांच्या निदर्शनास आले. हा आधार तुटल्यास संपूर्ण स्लॅब कोसळेल या भीतीने काम करणाऱ्यांपैकी चार सुतारकाम करणारे मजूर सपोर्ट व्यवस्थित करण्यासाठी खाली उतरले. बांधकामाच्या आत तळातच ३० ते ४० फूट खोल जुनी विहीर वजा बारव आहे.
ही बारव उघडी ठेवूनच वर स्लॅबचे काम सुरू होते. बारवेच्या पोकळीमुळे तिथे खालून योग्य आधार (सपोर्ट) देणे शक्य होत नसल्याने वरचा तोल पूर्णपणे ढासळला. मजूर सपोर्ट ठीक करत असतानाच एका बाजूचा संपूर्ण स्लॅब मोठ्या आवाजासह खाली आला. यात तीन मजुरांनी जिवाच्या आकांताने बाहेरच्या दिशेला धाव घेतल्याने ते बचावले, तर एक मजूर आतल्या दिशेने पळाल्याने तो थेट लोखंडी सळ्या आणि काँक्रिटच्या ढिगाऱ्याखाली अडकला.
या दुर्घटनेत अंकुश शांताराम कांबळे (३५, रा. विजय नगर, गारखेडा) आणि अशपाक शेख कडू (२५, रा. सुंदरवाडी) हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर बचावलेला तिसरा मजूर प्रचंड घाबरल्याने घटनास्थळावरून निघून गेला, त्यामुळे त्याचे नाव समजू शकले नाही. ढिगाऱ्याखाली दबलेल्या मजुराचे नाव सुरुवातीला प्रत्यक्षदर्शीनी खंडू विटनोरे (रा. गारखेडा परिसर) असे सांगितले होते. मात्र, कंत्राटदाराच्या माणसांनी नंतर संभ्रम निर्माण केल्याने ढिगाऱ्याखाली नक्की कोण अडकले आहे की नाही, याबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले.
मुख्य रस्त्यावरच हा प्रकार घडल्याने नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच महापौर समीर राजूरकर, पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, विरोधी पक्षनेते समीर बिल्डर, नगरसेवक काकासाहेब काकडे, मनपा उपायुक्त नंदकिशोर भोंबे, एमआयडीसी सिडको ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणपत राहिरे, शेषराव खटाने, सपोनि भरत पाचोळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर, स्टेशन अधिकारी विजय राठोड यांच्या नेतृत्वाखालील जवानांनी दोन क्रेनच्या मदतीने विहिरीवर व मलब्यावर पडलेले लोखंडी सळ्यांचे अजस्र जाळे कटरने कापून बाजूला करण्याचे काम हाती घेतले. वृत्त देईपर्यंत ढिगाऱ्याखाली दबलेल्या मजुराचा शोध लागलेला नव्हता. सूत्रांच्या माहितीनुसार, काही तांत्रिक परवान्यासाठी हे काम मागील दोन अडीच वर्षांपासून बंद होते. गेल्या महिनाभरापासून कामाला पुन्हा सुरुवात झाली. या कामाला परवानगी आहे की नाही? काम नेमके कशासाठी बंद होते? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
चिकलठाणा येथील एका नागरिकाने कॉल करून महापौर समीर राजूरकर यांना दुर्घटनेची माहिती दिली. त्यावरून तातडीने राजूरकर हे घटनास्थळी धावले. स्लॅबचा मलबा व अडकलेल्या सळ्या हटविण्यासाठी मोठी क्रेन लागेल अशी मागणी होताच महापौरांनी तातडीने उपलब्ध करून दिली. घटनास्थळी ते तळ ठोकून होते.
माहिती दडपण्यासाठी कंत्राटदाराचे मध्यस्थ धावले
एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतरही प्रकरणाचे गांभीर्य दडपण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कंत्राटदार राठोड याच्या हस्तकांनी घटनास्थळी गर्दीत घुसखोरी केली होती. सुरुवातीला घटनास्थळावरील मजूर पत्रकारांना व पोलिसांना वस्तुस्थिती सांगत होते. मात्र, कंत्राटदाराच्या हस्तकांनी मजुरांवर दबाव आणल्यानंतर काही वेळातच कामगारांचे सूर बदलले. माझ्या शेजारी कोण काम करत होते मला माहीत नाही, किती लोक होते ते आठवत नाही, खाली कोण अडकले आहे की नाही ते ठाऊक नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे कामगार देऊ लागले. दुसरीकडे, कंत्राटदार राठोड हा दुर्घटना घडताच घटनास्थळावरून पसार झाला. पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी त्याला फोन लावून जाब विचारला असता, तो मी स्वतः हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहे, अशी कारणे सांगत होता. जबाबदार व्यक्तींकडून चाललेल्या या लपवाछपवीमुळे पोलिस अधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.