पैठण : पैठण तालुक्यातील अपघाताची मालिका थांबता थांबत नाही अशी स्थिती असताना जिल्हा वाहतूक शाखा मात्र कागदी घोडे नाचविण्यात मग्न असल्याचे चित्र पहावयास मिळते.
पैठण ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर दररोज दिवसा व रात्री खुलेआम विना नंबर हायवा ओव्हरलोड व कालबाह्य झालेले वाहन अपघाताला निमंत्रण देत उजळमाथ्याने वाहतूक करीत असल्याने बुधवारी (दि.12) सकाळी एक जणाचा अपघातात बळी गेला आहे. विष्णू अण्णा बोबडे (वय 62 ,रा. वाहेगाव, ता.पैठण) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पैठण ते छत्रपती संभाजीनगरसह पैठण तालुक्याला जोडणाऱ्या वेगवेगळ्या गावांच्या रस्त्यावर दररोज छोटे मोठे अपघात होत आहेत. यात अनेकांचा बळी गेला. अपघातात मृत्यू होण्याच्या गंभीर घटना थांबत नसल्यामुळे या रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
पैठण छत्रपती संभाजीनगर मार्गावर याच हद्दीमध्ये काही दिवसांपूर्वी एका विना क्रमांकाच्या अवैध वाळू तस्कराच्या हायवा वाहनाच्या धडकेत पैठण येथील शिवसैनिक शिवाजी पठाडे यांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा तपास सुरू असताना मंगळवारी (दि.12) सकाळी साडेनऊ वाजता ईसारवाडी मार्गावर एच.पी पेट्रोल पंपाजवळ मोटारसायकलला क्रूझर वाहनाने जोरदार धडक दिली. अपघातात विष्णू अण्णा बोबडे गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि ईश्वर जगदाळे, बीट जमादार करतासिंग सिंगल यांनी तातडीने गंभीर जखमी विष्णू बोबडे यांना पैठण येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून बोबडे यांना मृत घोषित केले.
दरम्यान, अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनासह पोलिस प्रशासन विविध उपयोजना राबवत असताना वाहतूक शाखा मात्र फोटो सेशन पुरते कागदी घोडे नाचविण्यास व्यस्त असल्याची टीका होत आहे. अपघात टाळण्यासाठी ठोस उपाययोजना होत नसल्याने वाहनधारकांत नाराजी आहे.
अपघात घडल्यानंतर या मार्गावरून अति वेगाने वाळूची तस्करी करणारे विना नंबर हायवा वाहन निघून गेले. संबंधितांनी या वाहनाला सुखरूप रस्ता मोकळा करून दिला हे विशेष. दरम्यान, ग््राामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या माहितीनुसार जानेवारी ते मार्चपर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण 132 जणांचा अपघातात मृत्यू झाल्याची नोंद आहे.