

कोल्हापूर : गवशी पैकी पाटीलवाडी (दि.राधानगरी) येथे आज (दि.30) सकाळी रानगव्याने केलेल्या भीषण हल्ल्यात एक शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. संतू लहू आंबूसकर असे या जखमी शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, संतू आंबूसकर हे नेहमीप्रमाणे सकाळी साडेआठच्या सुमारास आपल्या शेतात काम करत होते. यावेळी अचानक दबा धरून बसलेल्या रानगव्याने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात आंबूसकर यांच्या पोटाला, हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. गव्याने धडक दिल्यानंतर परिसरात आरडाओरडा झाल्याने ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली, तोपर्यंत गवा जंगलाच्या दिशेने पसार झाला होता.
रुग्णवाहिकेअभावी नातेवाईकांचे हाल
घटनेनंतर जखमीला तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी शासकीय रुग्णवाहिकेशी संपर्क साधण्यात आला. मात्र, १०८ रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होऊ शकली नाही. अखेर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नातेवाईकांनी संतू यांना खासगी वाहनातून तब्बल १५ ते २० किलोमीटरचा प्रवास करून गोठे (ता. पन्हाळा) येथे आणले. तेथे १०८ रुग्णवाहिका पोहोचल्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी सीपीआरला हलवण्यात आले.
सीपीआरमध्ये उपचार सुरू
आंबूसकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात (CPR) दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
ग्रामस्थांमध्ये संताप आणि भीती
शेती कामासाठी बाहेर पडणाऱ्या शेतकऱ्यांवर गव्यांचे हल्ले वाढत असल्याने गवशी परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. एकीकडे जंगली प्राण्यांचा उपद्रव वाढला असतानाच, आपत्कालीन परिस्थितीत शासकीय रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. वन विभागाने या गव्याचा बंदोबस्त करावा आणि जखमी शेतकऱ्याला शासकीय मदत मिळवून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.