Paithan-Pandharpur Palkhi Highway : पैठण-पंढरपूर पालखी महामार्ग रखडला File Photo
छत्रपती संभाजीनगर

Paithan-Pandharpur Palkhi Highway : पैठण-पंढरपूर पालखी महामार्ग रखडला

मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंत्यांना नोटीस

पुढारी वृत्तसेवा

Paithan-Pandharpur Palkhi Highway works incomplete, notice to Chief Engineer, Executive Engineer

पाटोदा, पुढारी वृत्तसेवा : पैठण-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ ई वरील रखडलेली व अपूर्ण कामे वेळेत पूर्ण न झाल्याने औरंगाबाद खंडपीठाने राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य अभियंता व कार्यकारी अभियंत्यांना नोटीस बजावली आहे.

सदर महामार्ग २०१७ मध्ये राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला असून त्याचे काम गेली आठ वर्षे रखडले आहे. यामुळे नागरिकांना धूळ, खड्डे, अपूर्ण पूल, दळणवळणास अडथळे यांचा सामना करावा लागत आहे. पालखी मार्ग म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मार्गान वारकऱ्यांना व स्थानिकांना मोठा फायदा होणार होता, मात्र काम अपूर्णच राहिले आहे.

या कामाच्या अंमलबजावणीसाठी पाटोदा येथील महादेव नागरगोजे, ह.भ.प. रामकृष्ण रंधवे व चक्रपाणी जाधव यांनी यापूर्वी आंदोलने, निवेदने दिली होती. मात्र आश्वासन असूनही काम पूर्ण झाले नसल्याने याविरोधात जनहित याचिका क्र. २२/२०२४ उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. कोर्टाने काम ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र काम पूर्ण न झाल्याने आता अवमान याचिका क्र. ५०३/२०२५ दाखल करण्यात आली आहे.

९ जुलै २०२५ रोजी या याचिकेवर सुनावणी झाली असता, मुख्य अभियंता राजीव सिंग (मुंबई), कार्यकारी अभियंता एस.एल. गलांडे (संभाजीनगर) यांना नोटीस बजावून ६ ऑगस्ट २०२५ रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे. या प्रकरणात याचिकाकर्त्यांची बाजू अॅड. नरसिंह जाधव यांनी मांडली. त्यांना अॅड. रविंद्र वानखेडे आणि अॅड. गौरव खांडे यांचे सहकार्य मिळाले. शासनाची बाजू अॅड. एस. आर. वाकळे यांनी मांडली.

न्यायालयीन आदेश म्हणजे फक्त कागदावरची सूचना नाही, ती जनतेच्या सहनशीलतेची मर्यादा ठरवते. महामार्गाचे रखडलेले काम म्हणजे प्रशासनाच्या जबाबदारीपासून पळ काढणं आहे - हे आम्ही न्यायालयात पुन्हा पुन्हा अधोरेखित करणारच असे याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. नरसिंह जाधव यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT