Final Ward Structure : अंतिम प्रभाग रचना संकेत स्थळावर प्रसिद्धीचे आदेश  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Final Ward Structure : अंतिम प्रभाग रचना संकेत स्थळावर प्रसिद्धीचे आदेश

मनपाला निवडणूक आयोगाचे पत्र, ६ आक्टोबरच्या आत होणार प्रक्रिया

पुढारी वृत्तसेवा

Order to publish final ward composition on website

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रभाग रचनेवर प्राप्त आक्षेपांच्या सुनावणीनंतर प्रशासनाद्वारे निवडणूक आयोगापुढे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर आयोगाने महापालिकेच्या २९ प्रभाग रचनेच्या प्रारूप आर-ाखड्यावर शिक्कामोर्तब करून मंजुरी दिली आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि.३) आयोगाने ही अंतिम प्रभाग रचना संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत, अशी माहिती महापालिका निवडणूक विभागाचे उपायुक्त विकास नवाळे यांनी दिली. आता ६ ऑक्टोबरच्या आत केव्हाही प्रभाग रचना प्रसिद्ध करता येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेची आतापर्यंत वॉर्ड रचनेनुसार निवडणूका झाल्या. परंतु, आगामी सार्वत्रिक निवडणूक ही प्रभाग पद्धतीने होत आहे. राज्य शासनाने पहिल्यांदाच अशा पद्धतीने निवडणुकीचा निर्णय घेतल्याने इच्छुकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यासोबतच निवडणुका होत असल्याने अनेक इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरणही दिसत आहे. कोरोना महामारीनंतर पाच वर्षे महापालिकेवर प्रशासक आहे. या प्रशासकराजनंतर आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्यातील या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेने राज्य शासनाच्या आदेशावरून २९ प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार केला. यात चार सदस्यीय २८ प्रभाग आणि तीन सदस्यीय एक प्रभाग तयार करण्यात आला.

दरम्यान, हा आराखडा महापालिकेने शासनाला सादर केला. त्यास शासनाने मंजुरी देत राज्य निवडणूक आयोगाला सादर केला. त्यानंतर आयोगाने त्यास मंजुरी देत सूचना हरकतींसाठी प्रसिद्ध करण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. हा आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर प्रभाग रचनेवर ५५२ आक्षेप दाखल झाले होते. त्यापैकी केवळ अडीचशे जणांनीच प्रत्यक्षात सुनावणीला हजेरी लावली होती. त्यात सर्वाधिक सूचना या प्रभाग रचनेचे नकाशे आणि व्याप्तीतील विसंगतीबाबतच होत्या. त्यानुसार मनपाने तातडीने नकाशे आणि व्याप्तीतील त्रुटी दुरुस्ती केली. हा सुधारीत आराखडा महिला व बालकल्याण विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी आयोगाला सादर केला. या आराखड्यावर निवडणूक आयोगासमोर प्रशासक जी. श्रीकांत यांनी सादरीकरण केले. त्यात कशा प्रकारे आराखडा तयार केला, याची माहिती त्यांनी आयोगाला दिली.

आता प्रतीक्षा आरक्षणाची

महापालिकेच्या निवडणूक प्रभाग रचनेला निवडणूक आयोगाने अंतिम मंजुरी देत ही रचना संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता लवकरच प्रभागांच्या आरक्षण सोडतीचे आदेश आयोगाकडून महापालिकेला प्राप्त होण्याची शक्यता असून, त्याकडेच सर्व इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT